चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा क्षेत्रात आज (दि.४) तब्बल २५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता सहा विधानसभा क्षेत्रात एकूण ९५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ६ विधानसभापैकी चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज करत पक्षासमोर बंड पुकारले आहे. तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी भाजप उमेदवार विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.
जिल्ह्यात सहाही विधानसभा क्षेत्रात एकूण १५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३० अर्ज त्रुटी पूर्ण आढळल्याने फेटाळण्यात आले, त्यामुळे १२० उमेदवारांचे अर्ज कायम होते. आज (सोमवारी) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने २५ उमेदवारांनी माघार घेतली. आता एकूण ९५ उमेदवार एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.
महायुतीचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार, महाविकास आघाडीकडून प्रवीण पडवेकर, कांग्रेसचे बंडखोर राजू झोडे व भाजपचे बंडखोर ब्रिजभूषण पाझारे यांची लढत या विधानसभा क्षेत्रात होणार आहे.
महायुती तर्फे भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी कांग्रेसचे संतोष रावत यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र कांग्रेसच्या बंडखोर अभिलाषा गावतुरे व प्रकाश पाटील हे दोघे कांग्रेसचे निवडणूक लढवित आहेत. पाटील हे जुने कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
महाविकास आघाडी कांग्रेसचे सुभाष धोटे, महायुती भाजपचे देवराव भोंगळे, तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांची थेट लढत होणार आहे. देवराव भोंगळे हे बाहेरचे उमेदवार आहे असा ठपका राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार संजय धोटे व सुदर्शन निमकर यांनी ठेवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र भाजपच्या नेत्यांनी दोघांचे बंड शमविले.
वरोरा विधानसभा क्षेत्रात आघाडी कांग्रेसचे प्रवीण काकडे, महायुतीचे करन देवतळे, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर यांना कांग्रेसने उमेदवारी नाकारल्यावर त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असून तो कायम ठेवला आहे.यासह कांग्रेसचे इच्छुक उमेदवार चेतन खुटेमाटे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. भाजपचे माजी नगराध्यक्ष अहतेशाम अली यांनी तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी कायम ठेवली असून वरोरा विधानसभा क्षेत्रात मुकेश जीवतोडे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार हे निश्चित झाले आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी कांग्रेसचे विजय वडेट्टीवार, महायुती भाजपचे कृष्णा सहारे यांची थेट लढत होणार आहे. तत्पूर्वी भाजपचे वसंत वारजूकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती, मात्र भाजपने त्यांची समजूत काढत उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यामुळे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रातून महाविकास आघाडी कांग्रेसचे सतीश वारजूरकर विरुद्ध महायुती भाजपचे बंटी भांगडीया यांची थेट लढत आहे. या ठिकाणी कांग्रेसकडून धनराज मुंगले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची समजूत काढण्यास महाविकास आघाडीला यश मिळाले.