विदर्भ

चंद्रपूर : आज विदर्भात दिसणार खंडग्रास चंद्रग्रहण

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नुकतेच खंडग्रास सूर्यग्रहणाची पर्वणी लाभल्यानंतर पुन्हा देशभरातून आज, ८ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची पर्वणी चालून आली आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण विदर्भात दिसणार असून चंद्रपुरात १ तास ५४ मिनिटे पहायला मिळणार आहे. देशात पूर्वोत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पहावयास मिळेल तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ५.३० वाजता तर मुंबई येथून ६.०१ वा चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहण सुरु होईल. उर्वरित सर्व ठिकाणी ७.२६ वा ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७० टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ टक्के ग्रहण दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि 'स्काय वॉच ग्रुप'चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

विदर्भातून गडचिरोली जिल्ह्यात ५.३० वा चंद्रोदय ग्रहणाला सुरूवात होईल. येथे चंद्र ७० टक्के पृथ्वीच्या सावलीने झाकला जाईल. चंद्रपूर येथे ५.३३ वाजता ग्रहण दिसेल. येथे ६० टक्के भाग ग्रस्तोदित असेल. ग्रहण मध्यकाळ ०५.३५ वा तर ग्रहण अंत ०७.२६ वाजता होईल. पश्चिमेकडील जिल्ह्यात काही सेकंदाच्या फरकाने उशिरा ग्रहण दिसेल. शेवटी बुलढाना येथे ५.४५ वाजता ग्रहणाला सुरूवात होईल आणि अंत ७.२६ वाजता होईल. येथे १ तास ४१ मिनिटे ग्रहण दिसेल आणि चंद्र २५ टक्के ग्रस्तोदित असेल. सर्व ठिकाणी चंद्र क्षितिजावर १० डिग्री वर आल्या नंतरच चांगले ग्रहण पाहता येईल.

उद्याचे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका येथील काही भागातून दिसेल. पुर्वोत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल. परंतु, चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारताबाहेर ८ तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी १.३२ वा छायाकल्प चंद्रग्रहनाला सुरूवात होईल. २.३९ वा खंडग्रास ग्रहणाला सुरूवात होईल. ३.४६ वा खग्रास ग्रहणाला सुरूवात होईल तर ५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. ६.१९ वा खंडग्रास ग्रहण समाप्त तर ०७.२६ वा छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. ग्रहणाचा छायाकल्प काळ २.१४ तास, खंडग्रास काळ २.१५ तास, खग्रास काळ १.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ५.५४ तास असेल. भारतातून चंद्रोदयासोबतच ग्रहण लागलेले असेल आणि ७.२६ वा.ग्रहण संपेल. पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व-पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण (ग्रस्तोदित भाग) लहान होत जाईल.

खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय ?

सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते. यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत (Umbra) पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास (penumbra) तर उप् छायेत चंद्र आल्यास छायाकल्प (Antumbra) चंद्रग्रहण होते. दरवर्षी दोन तरी चंद्रग्रहणे होतात. २०२३ मध्ये एकूण ४ ग्रहणे होणार आहेत. त्यात २० एप्रिल २०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण, ५ व ६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, १४ ऑक्टोबर २३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८ व २९ ऑक्टोबर २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहणाचा समावेश आहे. पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात. ग्रहणे हा केवळ उनं-सावल्यांचा खेळ असून त्याबधल अंधश्रद्धा मानने अगदी चुकीचे आणि अवैज्ञानिक आहे. चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही. पूर्व दिशेला क्षितिज दिसेल अश्या मैदानांत किंवा घराच्या सुरक्षित छतावर जावून साध्या डोळ्याने किंवा लहान दुर्बिणी / बायनोकुलरने ग्रहण पहावे.

भारतातील ग्रहण वेळा

भारतात अरुणाचल प्रदेशातून ०४.२३ वा जवळ जवळ खग्रास स्थितीतच चंद्रोदय होईल आणि ३ तास ग्रहण दिसेल. कोलकाता येथून ०४.५२ वा.२.३४ तास दिसेल. पटना येथून ०५.०० वा २.२५ तास दिसेल. वाराणसी येथून ०५.०९ वा.०२.१६ तास दिसेल. लखनऊ येथे ०५.१५ वा २.१० तास तर दिल्ली येथे ०५.३१ वा. १.५८ तास दिसेल. तसेच बिकानेर येथे ०५.५७ वा १.४१ तास दिसेल तर भूज येथून ०६.१० वाजता आणि सर्वाधिक कमी काळ (१.१८ तास) ग्रहण दिसेल.

महाराष्ट्रातील ग्रहण वेळा

गडचिरोली येथून ग्रहणाला ०५.२९ वा सुरुवात होईल आणि ०७.२६ वा ग्रहण संपेल. येथे सर्वाधिक १ तास ५६ मिनिटे ग्रहण दिसेल आणि ग्रस्तोदित चंद्र ७० टक्के दिसेल. चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता, नागपूर येथे ०५.३२ वाजता, यवतमाळ येथे ०५.३७ वा., अकोला येथे ०५.४१ वा, जळगाव येथे ०५.४६ वा., औरंगाबाद येथे ०५.५० वा, नाशिक येथे ०५.५५ वा., पुणे येथे ०५.५७ वा., मुंबई येथे ग्रहण ०६.०१ वाजता सुरु होऊन ०७.२६ वा ग्रहण संपेल. समुद्र किनारी भागात महाराष्ट्रात सर्वात कमी काळ म्हणजे १ तास २५ मिनिटेच ग्रहण दिसेल.

कुठे, केव्हा, किती काळ ग्रहण दिसेल

गडचिरोली, गोंदिया, भंडारा – १.५६ तास, चंद्रपूर, नागपूर – १.५४ तास, वर्धा, यवतमाळ -१.४९ तास, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी -१.४८ तास, जळगाव, औरंगाबाद, बीड – १.३६ तास, सोलापूर – १.२८ तास, धुळे, मालेगाव, अहमदनगर -१.३३ तास, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा – १.२९ तास, मुंबई, अलिबाग, गोवा, रत्नागिरी -१.२५ तास दिसेल.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT