चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर महानगराजवळील दुर्गापुर खुल्या कोळसा खाणीच्या (ओपन कॉस्ट) विस्तारीकरणाला केंद्र सरकार व राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नुकत्याच मिळालेल्या मंजुरीमुळे जल, जंगल, वन्यप्राणी व पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी, अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे विस्तारीकरणाच्या मंजुरीला चंद्रपुरातून आता विरोध होऊ लागला आहे.
चंद्रपूर महानगराजवळील दुर्गापुर ओपन कास्ट कोळसा खान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ह्या खाणीमुळे जल, जंगल आणि वाघाचा अधिवास कमी झाला असून इथे वन्यजीव मानव संघर्ष सुरू आहे. ह्यातच पुन्हा केंद्र आणि राज्य सरकारने 121.58 हेक्टर जंगलाची जमीन कोळसा खाणीच्या विस्तारीकरणासाठी दिली आहे. ह्यामुळे परिसरात पर्यावरण, जंगल, वण्यप्राणी आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान होणार आहे.
खाणीच्या विस्तारीकरणाला चंद्रपुर विरोध होऊ लागला आहे. येथील वन्यजीव संस्था आणि वण्यप्रेमींनी नुकतीच एक बैठक घेऊन ताडोबा बचाव समितीची स्थापना केली असून ह्या विस्तारिकारणाला विरोध करण्यात येत आहे. ही खान 13 वर्षांपूर्वी येऊ घातलेल्या अदानी कोळसा ब्लॉकला लागून,सीनाळा गावाजवळ असल्यामुळे, आणि या खाणीच्या परिसरात किमान आठ ते दहा वाघ आणि असंख्य वन्यजीव आहेत. ह्या विस्तारिकरणात 121.58 हेक्टर जंगल कापल्या जाणार असून त्यात 13457 वृक्ष आणि 64349 बांबू कोळश्यासाठी तोडल्या जाणार आहेत. खाणीसाठी लागणाऱ्या बहुतेक मंजुरी वन विभागाने ,राज्य आणि केंद्र शासनाने दिल्या आहेत. राज्यात चंद्रपुरात आधीच अधिकची वीज तयार होत असताना आणि शासनाचे ग्रीन ऊर्जेचे धोरण असताना गरज नसताना कोळश्यासाठी जंगल,वाघ , वन्यजीव आणि ताडोबा चे जंगल देणे योग्य नाही. ह्या खाणी मुळे ताडोबाचे जंगल आणि वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात येत असल्यामुळे या खाणीला जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष कोळसा खाणीच्या परिसरात जाऊन विरोध दर्शवण्यात येणार आहे. चंद्रपूर मधील विविध सामाजिक आणि वन्यजीव विषयक संघटनांचे फेडरेशन 'ताडोबा बचाव समितीने आंदोलनाला पुढाकार घेत आहे.
उद्या 5 जून 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता चंद्रपूर मधील विविध पर्यावरण विषयक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांची प्रतिनिधी सिनाळा येथे प्रस्तावित खाण क्षेत्रात एकत्र येऊन हा विरोध दर्शविणार आहेत. याशिवाय न्यायालयीन मार्गाने सुद्धा ही खाण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या सीमेजवळ अगदी दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर ही खान येऊ घातली असल्यामुळे या कोळसा खाणीचा चंद्रपूर परिसरातील वन्यजीवांवर अत्यंत वाईट परिणाम होणार आहे. चंद्रपूरच्या परिसरातील मानव वन्यजीव संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. याच वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्यजीवांनी, विशेषतः वाघांनी 52 व्यक्तींचा बळी घेतला आहे. परंतु ही कोळसा खान आल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील हा संघर्ष आणखी शिगेला पोचेल. शेतकरी, आदिवासी जंगलात मारले जातील अशी भीती पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केली आहे. आधीच या जिल्ह्यातील वाघांना जंगल कमी पडू लागले आहे, या जिल्ह्यातील 50 वाघ इतरत्र हरविण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. मागील महिन्यात दोन वाघांना नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले आहे, आणि दुसरीकडे या जिल्ह्यात जंगलात कोळसा खानीला परवानगी सुद्धा दिली जात आहे. यामुळे या खाणीच्या मंजुरीला रद्द करण्यात यावे असा पवित्रा जिल्ह्यातील पर्यावरण संघटनांनी घेतला आहे.
हेही वाचा