देऊळगाव राजा ः अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, अवघ्या दोन दिवसांत मोटारसायकल व शेतातील तुरीच्या कट्ट्यांची चोरी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या सततच्या चोरीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चंदनपूर (ता. चिखली) येथील शेतकरी मखाजी शंकर साळवे यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार घरासमोर उभी केलेली दुचाकी (एमएच 14 5459) रात्रीतून चोरट्यांनी लंपास केली. सकाळी शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
मुरादपूर (ता. चिखली) येथील तरुण शेतकरी योगेश कैलास इंगळे यांच्या शेतातील तुरीची काढणी करून ठेवलेले 18 कट्टे (अंदाजे 12 क्विंटल) चोरट्यांनी 16 जानेवारी दुपारी 12 ते 17 जानेवारी सकाळी 5 या कालावधीत चोरून नेले.
तपास लागेना
अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. “चोरी झाली की रिपोर्ट घेतला जातो, मात्र तपासाचा पाठलाग करून चोर पकडण्यात सातत्याने अपयश येत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.