ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वर्षांच्या वाघीणीचे स्थलांतर करण्यात आले Pudhari
बुलढाणा

Dnyanganga Wildlife Sanctuary | ज्ञानगंगा अभयारण्यातील 'धुरंधर' वाघाला मिळाली जोडीदारीण

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे महत्त्वाचे पाऊल; ताडोबातून दोन वर्षीय वाघीण दाखल

पुढारी वृत्तसेवा

Tigress Relocation Dnyanganga Wildlife Sanctuary

बुलढाणा, : बुलढाणा-खामगाव मार्गावरील ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या 'धुरंधर' या नर वाघाला अखेर जोडीदार मिळाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वर्षांच्या वाघीणीचे स्थलांतर करण्यात आले आहे. रविवारी (दि. २६) रात्री वनविभागाच्या नियमानुसार तिला पिंजऱ्यातून मुक्त करून ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले. 'टी-१६३ एसएएफ-१' असे या वाघीणीचे नाव आहे.

ज्ञानगंगा अभयारण्यात प्रजननक्षम वाघांची संख्या वाढविणे हा या स्थलांतरामागील प्रमुख उद्देश असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. यापूर्वी ३ जानेवारी २०२६ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वनीकरण केलेला अडीच वर्षीय उपप्रौढ नर वाघ 'पीकेटी-७सीपी-१' याला येथे आणण्यात आले होते. 'धुरंधर' या टोपणनावाने ओळखला जाणारा हा वाघ गेल्या सहा महिन्यांत येथील अधिवासाशी पूर्णपणे जुळवून घेतला आहे.

ज्ञानगंगा अभयारण्यात चढ-उताराचा नैसर्गिक भूभाग, तलाव, दाट पानझडीचे जंगल, मुबलक भक्ष्यसाठा आणि संरक्षित क्षेत्र असल्याने वाघांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 'धुरंधर'साठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून अर्धप्रौढ वाघीण आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

वनविभागाने राबविलेल्या वाघ स्थलांतर कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा भाग असून, राज्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणे आणि व्याघ्र संवर्धनाला चालना देणे हा यामागील उद्देश आहे. २९ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानगंगा अभयारण्यात वाघ-वाघीणीची जोडी स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल वनविभागाने उचलले आहे.

आगामी काळात ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र कुटुंबाचा विस्तार होऊन वाघांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे वनसंवर्धनाला बळ मिळेल, अभयारण्याचे वनवैभव समृद्ध होईल आणि पर्यावरण पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
यशवंत नागुलवार, उपवनसंरक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT