

बुलढाणा : महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली, २०२२ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील पहिला दत्तक विधान आदेश जिल्हाधिका-यांनी नुकताच पारित केला. यामुळे एका अनाथ चिमुकलीला प्रेमळ, सुरक्षित आणि हक्काचे कुटुंब लाभले तसेच दत्तक पालकांचेही अनेक वर्षांचे पालकत्वाचे स्वप्न साकार झाले आहे. कायदेशीर तरतुदी व बालकाच्या सर्वोत्तम हिताचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी आदेश पारित करून या प्रक्रियेला अंतिम मान्यता दिली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, दत्तक संस्था व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने ही प्रक्रिया पूर्ण केली. प्रत्येक बालकाला प्रेम, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.
दत्तक व्यवस्थेमुळे निराधार बालकांना कुटुंबाचा आधार मिळण्याबरोबरच समाजात संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेचा अवलंब करून निराधार बालकांना कुटुंबाचा आधार द्यावा,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.