अवैध वाळू उत्खननाविरोधात उपोषण pudhari photo
बुलढाणा

illegal sand mining : अवैध वाळू उत्खननाविरोधात उपोषण

प्रशासनाकडून दुर्लक्ष, आंदोलन चिघळण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सिंदखेडराजा : तालुक्यातील राहेरी बु., दुसरबीड, पांगरी उगले व जांभोरा परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाविरोधात राहेरी येथील तढेगाव फाटा येथे शेतकरी व ग्रामस्थांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा 15 वा दिवस पूर्ण झाला आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अवैध वाळू उत्खननाबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाने प्रभावी कारवाई केलेली नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे नदीपात्रातील वाळू उत्खननाचे तातडीने मोजमाप करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

अवैध वाळू वाहतुकीसाठी ये-जा करणाऱ्या जड वाहनांमुळे गावातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच खडकपूर्णा नदीपात्रातील अनियंत्रित उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, श्रीमंत राजे लखोजीराव जाधव गड किल्ले ऐतिहासिक वस्तू संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला. प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करावी, अन्यथा संस्थेचे पदाधिकारीही आंदोलनात सहभागी होतील, असे सांगण्यात आले.

या आंदोलनात दिलीपराव देशमुख, रामराजे, दिलीप देशमुख, माणिकराव देशमुख, विठ्ठल देशमुख आदी ग्रामस्थ सहभागी झाले असून तालुक्यातील विविध संघटनांकडूनही आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचे बालाजी देशमुख यांनी सांगितले.

  • उपोषणकर्ते बालाजी देशमुख यांनी सांगितले की, उपोषणाला आज 15 दिवस पूर्ण झाले असूनही प्रशासनाकडून केवळ प्रतिनिधींच्या भेटी होत आहेत; मात्र प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास या साखळी उपोषणाचे काही दिवसांतच आमरण उपोषणात रूपांतर करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT