बुलढाणा: व्यापारी शेषमल जैन यांच्या ताब्यातील पावणेपाच किलो सोने लुटण्यात आली. Pudhari Photo
बुलढाणा

Samruddhi Mahamarg Robbery | समृद्धी महामार्गावर फिल्मी स्‍टाईल दरोडा : चालकाच्या मदतीने व्यापाऱ्याचे पावणेपाच किलो सोने लुटले!

व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकली ः व्यापाऱ्याचा चालकच मास्टरमाईंड

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर सुरक्षेचे दावे फोल ठरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका सोन्याच्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, तब्बल पावणेपाच किलो सोन्यासह लाखोंची रोकड लुटण्यात आली. विशेष म्हणजे, या संपूर्ण दरोड्याच्या पूर्वनियोजित कटात व्यापाऱ्याचा विश्वासू वाहनचालकच सामील असल्याचे उघड झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोळ्याच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

नियोजनबद्ध कट आणि दरोडा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारातील 'मंगलसुत्रम' पेढीचे प्रतिनिधी शेषमल जैन हे व्यावसायिक कामानिमित्त खामगाव येथे आले होते. शुक्रवारी आपले काम आटोपून ते भाड्याने घेतलेल्या इनोव्हा कारमधून मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाले. मेहकर इंटरचेंजवरून समृद्धी महामार्गावर प्रवेश केल्यानंतर काही अंतरावरच हा थरार घडला.

चालकाचा बनाव: मेहकरजवळील फर्दापूर टोलनाका ओलांडल्यानंतर, चालकाने लघुशंकेचे निमित्त करून गाडी महामार्गाच्या कडेला थांबवली. दरोडेखोरांचा हल्ला: गाडी थांबताच, पाठीमागून आलेल्या एका कारमधून चार अज्ञात दरोडेखोर उतरले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता शेषमल जैन यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे जैन गोंधळलेले असतानाच, त्यांच्याच गाडीच्या चालकाने सोन्याचे दागिने आणि मोठी रोकड असलेली बॅग हिसकावली आणि दरोडेखोरांच्या गाडीत बसून मालेगावच्या दिशेने पळ काढला.

पोलिसांचा तपास आणि नाकाबंदी

या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी फर्दापूर आणि मालेगाव येथील टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, दरोडेखोरांची कार मालेगाव टोलनाका ओलांडून पातूरच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली, मात्र तोपर्यंत दरोडेखोरांनी आपले वाहन रस्त्यातच सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला होता.

मेहकर पोलिसांनी याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी चालक आणि त्याच्या साथीदारांचा कसून शोध सुरू आहे. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील रात्रीच्या प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विश्वासू व्यक्तीच अशा प्रकारे कट रचत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT