जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह ५९ पदाधिकारी व समर्थकांनी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला स्वतंत्र निवेदने दिली Pudhari
बुलढाणा

Buldhana Morcha | बुलढाण्यात रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मोर्चा; गायकवाड समर्थकांचा ‘जर-तर’चा इशारा

Sanjay Gaikwad Case | कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण झालेला वाद राज्यभर पेटताना दिसत आहे

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Gaikwad vs Rohit Pawar

बुलढाणा : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण झालेला वाद राज्यभर पेटताना दिसत आहे. या प्रकरणात बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा मुद्दा आता राजकीय वादळाचे रूप धारण करत आहे.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २८) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्रकाशक प्रशांत आंबी यांचाही सहभाग असणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे वातावरण तापले असून शिवसेना शिंदे गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत यांच्यासह ५९ पदाधिकारी व समर्थकांनी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला स्वतंत्र निवेदने दिली आहेत.

या निवेदनात ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत तो बदलावा, पुस्तकावर बंदी घालावी आणि प्रकाशकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या निवेदनात, रोहित पवार यांच्या मोर्चाचे स्वागत करताना मोर्चादरम्यान किंवा वाचनावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा सन्मानपूर्वक उल्लेख करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आमदार संजय गायकवाड यांच्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य झाल्यास त्याला ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशाराही शिंदे गटाने दिला आहे. मंगळवारी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेवर झालेल्या ‘जोडो मारो’ आंदोलनानंतर त्यांच्या समर्थकांकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिमेचे दुग्धाभिषेक करून निषेध नोंदवण्यात आला होता. आता मंगळवारच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT