

मलकापूर : सोशल मीडियावर 'कमी पैशांच्या बदल्यात जास्त पैसे' देण्याचे आमिष दाखवून लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मलकापूरमध्ये कारवाई करत जेरबंद केले. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चाकू हल्ला केला, ज्यात एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींमध्ये अमोल रमेश गोरे (२५), भरत मधूकर वानखेडे (२५), अविनाश सुनील तायडे (२२, तिघेही रा. मलकापूर) आणि चेतन गुलाब पाटील (२५, रा. महालखेड, ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर परिसरातील काही तरुण इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून जाहिरातबाजी करत होते. ‘‘एक लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपये मिळवा,’’ असे आमिष ते गरजू आणि लोभी लोकांना दाखवत असत. जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या जाळ्यात अडकत असे, तेव्हा हे भामटे समोरच्या व्यक्तीकडून खरी रोकड घ्यायचे आणि त्याबदल्यात लहान मुलांच्या खेळातील 'चिल्ड्रेन बँक ऑफ इंडिया' च्या नोटांचे बंडल सोपवून पसार व्हायचे. समोरच्या व्यक्तीची फसवणूक होऊ नये म्हणून ते बंडलच्या सुरुवातीला आणि शेवटी ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा लावून ते पॅक करत असत.
या फसवणुकीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबूलकर यांना ७ एप्रिल रोजी मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने एक पथक तयार केले. या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनीच ग्राहक बनून इन्स्टाग्रामवर त्यांच्याशी संपर्क साधला. नोटा बदलण्याच्या बहाण्याने त्यांना मलकापूर शहरातील एका बेकरी जवळ बोलावण्यात आले. नियोजित ठिकाणी पोलीस पथक साध्या वेशात दबा धरून बसले होते.
ठरलेल्या वेळी दोन दुचाकींवरून चार संशयित तरुण तेथे पोहोचले. पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी पोलिसांशी झटापट सुरू केली. यावेळी एका आरोपीने पीएसआय अविनाश जायभाये यांच्यावर छोट्या चाकूने वार केला, ज्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र, पोलिसांनी जिवाची पर्वा न करता चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींच्या झडतीमध्ये त्यांच्याकडून कथित नऊ लाख रुपयांच्या, परंतु शून्य बाजारमूल्य असलेल्या 'चिल्ड्रेन बँक'च्या नोटांचे १८ बंडल जप्त केले. यासोबतच २ दुचाकी, २ चाकू, ६ मोबाईल फोन आणि १५०० रुपये रोख असा एकूण २ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संशयीत आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.