Prices of school supplies rise by 20 percent
पुढारी वृत्तसेवा : विदर्भातील शाळा ३१ जुलैपासून सुरू होणार असल्याने पालकांनी मुलांच्या शालेय साहित्याच्या खरेदीसाठी २० बाजारपेठांकडे धाव घेतली आहे. मात्र यंदा वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, रंगसाहित्य, स्कूल बॅग, डबे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर स्टेशनरी वस्तूंच्या किमतीत झालेल्या टक्क्यांपर्यंतच्या वाढीमुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वाढत्या महागाईचा थेट परिणाम शिक्षण क्षेत्रावरही होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी साहित्य खरेदीसाठी शहरातील स्टेशनरी दुकाने आणि पुस्तक विक्रेत्यांकडे मोठी गर्दी होत आहे. मात्र दरवाढीमुळे प्रत्येक वस्तूची किंमत वाढल्याने पालकांना अपेक्षेपेक्षा अधिक खर्च करावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत विविध प्रकारच्या वह्या, संदर्भ पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी एका विद्यार्थ्याच्या शालेय साहित्यावर हजारो रुपयांचा अतिरिक्त भार पडत आहे.
केवळ वह्या-पुस्तकेच नव्हे, तर पेन, पेन्सिल, इरेजर, शार्पनर, ड्रॉइंग साहित्य, रंग, प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या वस्तू, फाइल्स तसेच स्कूल बॅग, डबे आणि पाण्याच्या बाटल्यांच्याही किमती वाढल्या आहेत. काही ठिकाणी गणवेशांच्या दरातही वाढ झाल्याने नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
विशेषतः दोन किंवा तीन मुले शिक्षण घेत असलेल्या कुटुंबांवर या दरवाढीचा अधिक परिणाम होत असून अनेक पालकांना आवश्यक खर्चासाठी इतर खर्चावर कात्री लावावी लागत आहे. अनेक जण आवश्यक तेवढेच साहित्य खरेदी करत असून सवलतीच्या ऑफर्स, घाऊक खरेदी किंवा ऑनलाइन पर्यायांचा आधार घेत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर शालेय साहित्याच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य अनुदान योजना अधिक सक्षमपणे राबवावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
शालेय साहित्यांच्या दरांवर नियंत्रण ठेवावे
गरजू विद्यार्थ्यांसाठी साहित्य अनुदान योजना प्रभावी करावी. स्थानिक पातळीवर परवडणाऱ्या दरात शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. शिक्षणावरील वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात.
आर्थिक ताण
शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क असला तरी वाढत्या महागाईमुळे त्या हक्काची किंमत दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असतानाच शालेय साहित्याच्या दरवाढीने सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित मात्र चांगलेच विस्कटल्याचे चित्र देऊळगाव राजा परिसरात पहायला मिळत आहे.