Shivarasta : लोकसहभागातून साकारला पिंपरीच्या शेतकऱ्यांनी शिवरस्ता file photo
बुलढाणा

Shivarasta : लोकसहभागातून साकारला पिंपरीच्या शेतकऱ्यांनी शिवरस्ता

शेतकऱ्यांनी घडविला विकासाचा नवा आदर्श, शेतातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी

पुढारी वृत्तसेवा

Pimpri farmers create Shivarastra through public participation

देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या निधीची किंवा योजनेची प्रतीक्षा न करता स्वतःच्या लोकवर्गणीतून शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या अडथळ्यात असलेला शिवरस्ता मोकळा करून ग्रामीण भागासाठी अनुकरणीय आदर्श निर्माण केला आहे. पिंपरी आंधळे व आंचरवाडी येथील शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेल्या या उपक्रमामुळे सुमारे ३० शेतकऱ्यांच्या शेतातील दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.

आंचरवाडी ते पिंपरी आंधळे या परिसरातील शिवरस्ता अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे बंद अवस्थेत होता. त्यामुळे शेतात जाणे, शेतीमालाची वाहतूक करणे तसेच कृषी यंत्रसामग्री ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

ही समस्या सोडविण्यासाठी गावातील जागरूक नागरिक आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत मतभेद बाजूला ठेवले आणि लोकवर्गणी उभारण्याचा निर्णय घेतला. या निधीतून जेसीबी व रोलरच्या साहाय्याने सुमारे एक किलोमीटर लांबीचा आणि १४ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी दोन फूट रुंदीचे नालेही खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता टिकून राहण्यास मदत होणार असून वर्षभर शेतकऱ्यांना सुरक्षित व सुलभवाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, इंधन आणि वाहतुकीवरील खर्च कमी होणार असून शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविणे अधिक सोपे होणार आहे.

कोणत्याही शासकीय मदतीशिवाय केवळ लोकसहभाग, परस्पर विश्वास आणि एकोप्याच्या बळावर उभारलेले हे काम ग्रामीण विकासातील प्रेरणादायी उदाहरण म्हणून परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. परिसरातील शेतकरी प्रेरणा घेत आहे.

या उपक्रमात शिक्षक एकनाथ भीमराव डोईफोडे, तलाठी दिलीप वसंता आंधळे, माजी सरपंच जगदेव गणपत डोईफोडे यांच्यासह गजानन देवराव डोईफोडे, गणेश सुखदेव डोईफोडे, संतोष भिमराव डोईफोडे, कांता चाटे, वैभव डोईफोडे, रामा ढाकणे, शिवा विष्णू आंधळे, तरुण कारभारी आंधळे, आत्माराम परिहार, संजय गुमलाडू, विजय गुमलाडू, कारभारी गोविंदा डोईफोडे, नारायण कारभारी डोईफोडे आणि दौलतराव डोईफोडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

विकासाचा मार्ग

ग्रामीण भागातील विकासासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातूनही मोठी कामे उभी राहू शकतात, याचा प्रत्यय पिंपरी आंधळे येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. एकोप्याने उभारलेला हा शिवरस्ता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT