मयुर गोलच्छा
लोणार : जगातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उल्काघाती सरोवर, राष्ट्रीय भू-वारसा स्थळ, आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रामसर पाणथळ क्षेत्र आणि शासनाचा ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ इतकी बलस्थाने एकाच शहराकडे असतानाही लोणारला स्वतंत्र्याच्या ७५ वर्षांतही त्याच्या क्षमते इतका पर्यटन विकास साधता आलेला नाही. याचे प्रमुख कारण पर्यटनस्थळाची कमतरता नसून, पर्यटकाला लोणारपर्यंत आणणारी, येथे थांबवणारी आणि त्याचा मुक्काम वाढवणारी पर्यटन व्यवस्था पुरेशा प्रमाणात विकसित न होणे, हे आहे.
महाराष्ट्र पर्यटन विभागही लोणारच्या वैज्ञानिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि जैवविविधतेच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करतो. दैत्यसूदन मंदिर, गोमुख परिसर, कमळजा देवी मंदिर, प्राचीन मंदिरे, जंगल आणि पक्षीवैविध्य यामुळे येथे केवळ एक सरोवर पाहण्यापेक्षा व्यापक पर्यटन अनुभव विकसित करण्याची क्षमता आहे. मात्र, पर्यटनस्थळ कितीही वैशिष्ट्यपूर्ण असले तरी रस्ते यंत्रणा, राहण्याची सोय, खमंग जेवणाची सोय, सुरक्षितता आणि स्वच्छता अनुभव ही साखळी मजबूत नसेल तर मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी पर्यटक आकर्षित करणे कठीण आहे. त्यामुळे आता लोणारच्या विकासाकडे केवळ सरोवर परिसरातील कामे म्हणून न पाहता स्वतंत्र ‘ लोणार पर्यटन स्थळ विकास’ म्हणून पाहण्याची गरज आहे. लोणारच्या पर्यटन विकासातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कनेक्टिव्हिटी.
महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार जवळचे प्रमुख रेल्वे स्थानकजालना सुमारे ९० किलोमीटर, तर छत्रपती संभाजीनगरचे विमानतळ सुमारे १४० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर–जालना–लोणार, शेगाव–खामगाव–लोणार, अकोला–लोणार तसेच समृद्धी महामार्गाच्या जवळच्या इंटरचेंजपासून लोणार पर्यंतचे मार्ग पर्यटन कॉरिडॉर म्हणून विकसित करण्याचा विचार व्हावा.
दर्जेदार रस्ते, स्पष्ट दिशादर्शक फलक, नियमित वातानुकूलित बस, पर्यटन शटल आणि टॅक्सी नेटवर्क निर्माण झाल्यास प्रवास अधिक सुलभ होईल. दीर्घकालीन दृष्टीने लोणारला रेल्वे नेटवर्कशी अधिक प्रभावीरीत्या जोडण्याची व्यवहार्यता तपासली पाहिजे. त्याचप्रमाणे पर्यटन, आपत्कालीन सेवा आणि लहान विमानांच्या दृष्टीने लहान एअरस्ट्रीप/एरोड्रोम व्यवहार्य आहे का, याचा तांत्रिक व आर्थिक अभ्यास करण्याची गरज आहे. कोणताही प्रकल्प पर्यावरणीय निर्बंध, प्रवासी मागणी आणि व्यवहार्यता अभ्यासानंतरच ठरवावा.
४३४ कोटींच्या आराखडा
उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर ₹४३४.६२ कोटींचा लोणार सरोवर विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून विविध विभागांमार्फत संवर्धन, देखभाल आणि विकासाची कामे निर्धारित करण्यात आली आहेत. मात्र आता या गुंतवणुकीसोबत पुढील टप्प्याचा स्पष्ट आर्थिक आराखडा आवश्यक आहे. म्हणजे आज वर्षाला किती पर्यटक येतात, पाच वर्षांनी किती पर्यटकांचे उद्दिष्ट आहे, सरासरी मुक्काम किती तासांवरून किती दिवसांपर्यंत न्यायचा, किती हॉटेल रूम आवश्यक आहेत, किती स्थानिक रोजगार निर्माण करायचे आणि पर्यटनातून शहरात किती आर्थिक उलाढाल निर्माण करायची यासाठी मोजता येतील अशी उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत.
स्वतंत्र ‘लोणार पर्यटन कृती समिती’ची गरज
लोणारच्या पर्यटनाशी पर्यटन विभाग, वन विभाग, पुरातत्त्व विभाग, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन आणि इतर अनेक यंत्रणा संबंधित आहेत. त्यामुळे समन्वयाचा अभाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभाग, नगरपरिषद, पर्यटन व्यावसायिक, हॉटेल क्षेत्र, स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांचा समावेश असलेली ‘लोणार पर्यटन विकास व समन्वय समिती’ कार्यरत करणे उपयुक्त ठरेल. दर तीन महिन्यांनी विकासकामे, पर्यटक संख्या, स्वच्छता, वाहतूक, गुंतवणूक प्रस्ताव आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा सार्वजनिक केल्यास विकासाला सातत्य मिळू शकते.