बुलढाणा : यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाने मोठी दडी मारलीय. पर्जन्यमानाची सरासरी पातळी गाठली नाही. त्यामुळे पेयजल आणि सिंचनाची चिंता भेडसावत आहे. वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्याने खरीपाची पिके करपल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृशस्थिती आहे. पावसाअभावी शेतीला सिंचनासाठी पर्याय ठरणाऱ्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती समाधानकारक नाही. आज २४ सप्टेंबरच्या सकाळी जलसंपदा विभागाने नोंदवलेल्या अहवालावरून दिसून येते. बोटावर मोजता येणाऱ्या प्रकल्पांतच पुरेसा तर अन्य प्रकल्पांत अगदीच अत्यल्प जलसाठा आहे.
जिल्ह्यात नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे तीन मोठे जलसंपदा प्रकल्प आहेत. नळगंगा प्रकल्पामध्ये ८१.४३ टक्के तर पेनटाकळी प्रकल्पात ८१.८३टक्के जलसाठा असला तरी खडकपूर्णा जलसंपदा प्रकल्पातील जलसाठा चिंताजनक आहे. या प्रकल्पात केवळ ७.४४ टक्के इतकाच अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पावर अवलंबून असलेले कालवे, उपसा सिंचन, पेयजल पुरवठा योजना आदींसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा व उतावळी हे ७ मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये आजघडीला पलढग मध्यम प्रकल्पात १०० टक्के तर ज्ञानगंगा प्रकल्पात ९८.८५ टक्के, जलसाठा तर त्याखालोखाल उतावळी ९४.५९ टक्के, कोराडी ९३.५८ टक्के आणी मस प्रकल्पात ६७.६९ टक्के जलसाठा आहे. मन प्रकल्पात केवळ ४४.२६ टक्के तर तोरणा प्रकल्पात ३३.९७ टक्के इतकाच अत्यल्प जलसाठा आहे.
मन व तोरणा मध्यम प्रकल्पांची जलपातळी चिंताजनक समजली जात आहे. जिल्ह्यातील एकूण ४२ लघूपाटबंधारे प्रकल्पातील सरासरी जलसाठा हा ५६.१८टक्के इतकाच असल्याने भविष्यात गुरांना पेयजलाची समस्या भेडसावण्याची तसेच रब्बीच्या सिंचनाचीही समस्या भेडसावण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रकल्प क्षेत्रातील यावर्षीचे पर्जन्यमान
जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार विविध प्रकल्प क्षेत्रात झालेला पाऊस मिलीमिटर मध्ये असा आहे. नळगंगा-३२० मि. मी., खडकपूर्णा-३४८, पेनटाकळी-६५६, पलढग-२९१, ज्ञानगंगा-३७७, कोराडी-६९३, उतावळी-३२१, मस-३४५, तोरणा-२५८, मन-२५८ मि.मी. यानुसार यावर्षी प्रकल्प क्षेत्रात पाऊस झाला आहे.