देऊळगाव राजा - तालुक्यातील देऊळगाव मही येथील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. ग्रामपंचायत सदस्य संदीप विजय राऊत व अनंता नारायण इंगळे यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जलकुंभार चढून केलेल्या 'शोले स्टाईल' आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन विविध कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यापूर्वी २६ जून रोजी ग्रामस्थांच्या वतीने जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही काम सुरू न झाल्याने २९ जून रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दैनिक पुढारीनेही या प्रश्नाला वाचा फोडत "जलजीवन मिशनचे काम पाच वर्षांपासून रखडले" या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनावर दबाव वाढला आणि अखेर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन लेखी आश्वासन दिले.
देऊळगाव मही येथील सुमारे ५ किलोमीटर अपूर्ण पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात येईल. प्रत्येक नळाला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येतील. १४० एमएम रायझिंग मेन पाईपलाईन फिल्टर प्लांटपासून गावाच्या वेशीपर्यंतचे काम २ जुलै २०२६ पासून सुरू करण्यात येईल. उर्वरित सर्व पाईपलाईनचे काम पूर्ण करून पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत करण्यात येईल.
हे लेखी आश्वासन कनिष्ठ अभियंता श्रद्धा संजय बनकर, आकाश कचरे, भूषणकुमार आडे व साईट इंजिनिअर हर्षल मोहिते यांनी दिले. आश्वासन पाळले नाही, तर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रशासक ज्योत्स्ना शिंगणे, ग्रामविकास अधिकारी व्ही. पी. चेके, संतोष जाधव, कारभारी देढे, हरिदास शिंदे, सागर बगळे आदी उपस्थित होते.
दिरंगाई नको
लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निश्चित मुदतीत काम पूर्ण करण्याचा इशारा देत आंदोलन मागे घेतले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम सुरू झाले नाही किंवा पुन्हा दिरंगाई झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
"आश्वासन नव्हे, आता प्रत्यक्ष काम हवे"
गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या देऊळगाव महीकरांना आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण केल्यास गावातील शेकडो कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.