Jalgaon Jamod Rain News
बुलढाणा : दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून, जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक २०७.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदुरा तालुक्यात १७४.८ मिलिमीटर पावसाची नोंद होत विक्रमी पर्जन्य झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी काही भागांत शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. खामगाव तालुक्यात १५२.९ मिमी, शेगावमध्ये १३९ मिमी, मलकापूरमध्ये १३१.२ मिमी, संग्रामपूरमध्ये ११७.८ मिमी, मेहकरमध्ये १११ मिमी, चिखलीमध्ये १०९ मिमी, मोताळा तालुक्यात १०६.७ मिमी, बुलढाणा तालुक्यात १०४ मिमी, लोणारमध्ये १०० मिमी, सिंदखेड राजा येथे ९८.१ मिमी, तर देऊळगाव राजा तालुक्यात ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली.
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसाच्या वार्षिक सरासरीशी तुलना करता जळगाव जामोद तालुका ७१.९३ टक्के पर्जन्यमानासह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ शेगाव ५९.९३ टक्के, नांदुरा ५७.९४ टक्के, मोताळा ५२.९९ टक्के, बुलढाणा ५२.३८ टक्के, मेहकर ५१.८४ टक्के, खामगाव ५०.३७ टक्के, चिखली ४७.५० टक्के, मलकापूर ४६.१७ टक्के, देऊळगाव राजा ४६.१० टक्के, सिंदखेड राजा ४२.७७ टक्के, संग्रामपूर ४२.५० टक्के, तर लोणार ३९.७८ टक्के पर्जन्यमानावर पोहोचला आहे.
दोन आठवड्यांच्या उघडीपीनंतर झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्यांत अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून, सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले काठोकाठ भरून वाहत आहेत. अनेक लघू सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेच्या दिशेने वाटचाल करत असून, मध्यम व मोठ्या जलसंपदा प्रकल्पांमध्ये अद्याप ४० ते ६० टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.