शेंगदाण्याच्या भावात जोरदार तेजी  pudhari photo
बुलढाणा

Peanut prices increase : शेंगदाण्याच्या भावात जोरदार तेजी

आवक घटली; किरकोळ बाजारात 170 रुपयांपर्यंत दर

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा : शेंगदाण्याच्या भावात जोरदार वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या किराणा सामानाच्या खर्चात वाढ झाली आहे.शेंगदाण्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे. गेल्या महिन्यात 140 रुपयांपर्यंत उपलब्ध असलेला शेंगदाणा सध्या किरकोळ बाजारात 160 ते 170 रुपयांदरम्यान विकला जात आहे. दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या या घटकाच्या दरवाढीमुळे गृहिणींच्या खरेदी यादीत कपात करावी लागत असल्याचे चित्र आहे.

व्यापारी वर्गाच्या माहितीनुसार, यंदा बदलत्या हवामानाचा व अवकाळी पावसाचा फटका पिकाला बसल्याने उत्पादनात घट झाली. त्याचबरोबर बाहेरील बाजारातून होणारी आवक मंदावल्याने स्थानिक बाजारपेठेत पुरवठा कमी पडत आहे. मागणी कायम असताना माल कमी उपलब्ध असल्याने दरात वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरवाढीचा परिणाम केवळ घरगुती वापरावरच नव्हे, तर लघुउद्योगांवरही जाणवत आहे. फरसाण निर्माते, पोहे विक्रेते तसेच लहान हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी शेंगदाणा कूट, चटणी, लाडू यांसारख्या पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बाजारातील चढ-उतार लक्षात घेता दर लवकर स्थिरावतील की आणखी वाढतील, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही ग्राहक पर्यायी वस्तूंकडे वळत असल्याचेही व्यापाऱ्यांनी नमूद केले.

भाव आणखी वाढणार

अंढेरा येथील गजानन किराणाचे व्यापारी विष्णू गायकवाड यांनी सांगितले की, घाऊक बाजारात दर सातत्याने वाढत आहेत. सध्या जुनाच साठा विक्रीस आहे. नवीन मालाची आवक अपेक्षेपेक्षा कमी आहे. पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT