आठ वर्षीय मुलाची साक्ष ठरली निर्णायक pudhari photo
बुलढाणा

Buldhana Crime : आठ वर्षीय मुलाची साक्ष ठरली निर्णायक

जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा ः कौटुंबिक कलहाचे रूपांतर अखेर एका निरपराध महिलेच्या हत्येत झाले आणि या गंभीर गुन्ह्याचा शेवट न्यायालयाने कठोर शिक्षेच्या रूपाने केला. पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी देऊळगाव राजा येथील सुनील भास्कर गिते (35) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात आरोपीचा अवघ्या आठ वर्षांचा मुलगा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला आणि त्याच्या साक्षीने न्यायालयीन निर्णयाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेसह दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. तसेच इतर कलमांखालीही स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली आहे. मयत शिवकन्या गिते (वय 25) या गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक त्रासामुळे माहेरी राहत होत्या.

मध्यस्थीने समझोता झाल्यानंतर त्या पुन्हा सासरी परतल्या; मात्र काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान 3 एप्रिल 2023 रोजी अत्यंत दुर्दैवी घटनेत झाले. संतापाच्या भरात आरोपीने पत्नीचा साडीने गळा आवळून जीव घेतल्याचा आरोप तपासात सिद्ध झाला.

घटनेनंतर शेजाऱ्यांनी महिलेस रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवाल, पंचनामा आणि साक्षीदारांच्या जबाबांमधून गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी विविध पुरावे गोळा केले. न्यायालयात सरकारी पक्षाने 14 साक्षीदार तपासले. त्यामध्ये मयत व आरोपीचा मुलगा प्रतीक गिते याची साक्ष सर्वाधिक महत्त्वाची ठरली. घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या या बालकाने घडलेला प्रकार न्यायालयासमोर सांगितला. तसेच शेजारी, नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षींनीही सरकारी पक्षाचा दावा अधिक भक्कम केला.

बचाव पक्षाने हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा युक्तिवाद केला; मात्र उपलब्ध पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने तो दावा फेटाळून लावला. परिणामी आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यायालयाने दंडाच्या रकमेपैकी आठ हजार रुपये बालसाक्षीदार प्रतीक याला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देशही दिले. या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी प्रभावीपणे मांडली, तर पोलिसांनीही पुरावे सादर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

समाजासाठी धडा

कौटुंबिक वाद, संशय किंवा रागाच्या भरात घेतलेला हिंसक निर्णय केवळ एका व्यक्तीचा जीव घेत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. या प्रकरणात आई गमावलेल्या चिमुकल्याच्या साक्षीनेच वडिलांना शिक्षा झाली, ही बाब समाजासाठी मोठा धडा आहे. मतभेद संवादाने मिटविण्याऐवजी हिंसेचा मार्ग स्वीकारणाऱ्यांना कायदा कठोर शिक्षा देतो, हे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT