

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग गल्ली क्रमांक चारमध्ये स्वानंंद काॅलनीत पाताडे कुटुंब राहते. साडेबारा वर्षांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास याच स्वानंंद काॅलनीमध्ये काळजाचा ठोका चुकविणारी घटना घडली होती. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन रागाच्या भरात पत्नी आणि झोपेत असलेल्या चार मुलांवर धारदार पात्याने हल्ला करून माथेफिरूने त्यांना गंभीर जखमी केले होते.
या हल्ल्यात नऊ वर्षाचा प्रणव उर्फ देवेश सुनील पाताडे (९) या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. पत्नी मीनासह तिच्या प्रणव उर्फ देवेश (९), सुजित, शुभम (५) आणि सर्वेश (अडीच वर्ष) या तिन्ही मुलांना गंभीर जखमी केले होते. या खटल्याचा निकाल जाहीर करताना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस. एस. इनामदार यांनी मारेकरी सुनील सदाशिव पाताडे (४६) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने सुनील पाताडे याला पाच हजार रूपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मार्च २०१३ रोजी खुनाची घटना घडली होती. साडेबारा वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. या संदर्भात हल्ल्यातून बचावलेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या पत्नी मीना पाताडे हिच्या जबानीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल होता.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, पोलिस निरीक्षक विजय नाईक आणि त्यांचे सहकारी सोपान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. के. धनवडे यांनी तपास करून कल्याण जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सुनील पाताडे याला अटक केली होती. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. संजय गोसावी, ॲड. जयश्री भटेजा, तर आरोपीतर्फे टी. ए. देवरे यांनी काम पाहिले. न्यायालय आणि पोलिस ठाण्याचे समन्वयक म्हणून पोलिस उपनिरीक्षक आर. डी. आटपाटकर, हवालदार संंजय शेलार, भालचंद्र पवार आणि जयश्री झोळेकर यांनी काम पाहिले.
कठोरात्मक शिक्षेची रहिवाशांकडून मागणी
मार्च २०१३ मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबप्रमुख सुनील पाताडे याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी मीना हिच्याशी भांडण उकरून काढले. त्यानंतर रागाच्या भरात पत्नीसह इतर चारही मुलांंवर धारदार पात्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात प्रणव उर्फ देवेश (९) याचा जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि इतर तीन मुले गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सुनील पाताडे याला अटक केली होती. या घटनेनंतर कल्याणच्या रामबागेतील स्वानंंद काॅलनीमध्ये एकच खळबळ माजली होती. आरोपीवर कठोरात्मक शिक्षेची स्थानिक रहिवाशांनी मागणी केली होती.
ठोस साक्षी/पुराव्यांमुळे खडीफोड
न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी वकील ॲड. संजय गोसावी यांनी या गुन्ह्यातील सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर करून आरोपी सुनील या घटनेला प्रत्यक्ष कसा जबाबदार आहे हे न्यायालयाला साक्षी/पुराव्याने पटवून दिले. आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यात प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याचे, तसेच साक्षीत आणि घटनेत सातत्य नसल्याचे सांगून सरकार पक्षाचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने या घटनेचा पंचनामा, साक्षीदार आणि एकूण घटनाक्रम आणि सबळ पुराव्यांच्या आधारे या खटल्यातील सुनील पाताडे हाच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.