देऊळगाव राजा ः तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात असलेले ट्रामा केअर सेंटर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते. याबाबत काही जणांनी तक्रारी केल्यानंतर या केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. या केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर होत असून हजारो रुग्णांना आरोग्य सेवा दिली जात असल्याने रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी निवेदन देउन ट्रामा केअर सेंटरमध्ये डॉक्टर व तंत्रज्ञांच्या रिक्त जागांमुळे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही यंत्रसामग्री वापरली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (मंत्रालय) आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून अहवाल मागवला होता. त्यानंतर हे ट्रामा केअर सुरू करण्यात आले असून मागील 3 महिन्यांत 2 हजार 229 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांनी 5 जानेवारी रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, ट्रामा केअर सेंटरमधील स्थिती आता सुधारली असल्याचे सांगितले. एप्रिल 2024 पासून केंद्रात अस्थिरोग तज्ज्ञ उपलब्ध झाले असून उपचार सुरळीत सुरू आहेत.गेल्या तीन महिन्यांत 1800 रुग्णांनी ओपीडी सुविधेचा लाभ घेतला. सुमारे 196 रुग्णांना प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल करून उपचार देण्यात आले.या कालावधीत 89 रुग्णांना प्लास्टर करण्यात आले.
सकारात्मक
ट्रामा केअर सेंटरमधील रिक्त पदांबाबतची आकडेवारी आता सकारात्मक असून. केंद्रासाठी 13 पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत 12 पदे भरलेली असून 1 पद रिक्त आहे. डॉ. श्रीकृष्ण चव्हाण (अस्थिव्यंग शल्य चिकित्सक)हे एप्रिल 2025 मध्ये, तर डॉ. विलास दराडे (वैद्यकीय अधिकारी) सप्टेंबर 2024 मध्ये रुजू झाले आहेत.यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे.