देऊळगाव राजा : अंढेरा परिसरात पाऊस नसल्याने कोवळी पिके करपून जात आहे. pudhari photo
बुलढाणा

Buldhana Agriculture News : देऊळगाव राजा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट; पावसाने फिरवली पाठ

तालुक्यात यंदा सुमारे ३५ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा : आर्द्रा नक्षत्रातील पावसावर विश्वास ठेवून खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केलेल्या देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे ठाकले आहे. गेल्या सात दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शेतातील कोवळी पिके करपू लागली असून, समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.

तालुक्यात यंदा सुमारे ३५ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. यावर्षी मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. त्यानंतर आर्द्रा नक्षत्रात झालेल्या पाच-सहा चांगल्या पावसांवर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. काही ठिकाणी जमिनीमध्ये खोलवर बियाणे गेल्यामुळे व काही भागात आढळून पाणी पडल्यामुळे काही शेतकऱ्यांचे बियाणे दबल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीही करावी लागली. त्यानंतर मात्र पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतातील पिके अडचणीत आली आहेत.

सध्या कडक ऊन, जोराचा वारा आणि वाढते तापमान यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सोयाबीन, तूर, कापूस यांसारख्या पिकांना या टप्प्यावर पाण्याची अत्यंत गरज असते. मात्र पावसाअभावी कोवळी रोपे सुकण्याच्या मार्गावर असून, काही भागात अजूनही पेरण्या रखडलेल्या आहेत.

यावर्षी मृग नक्षत्रात पेरणीच झाली नाही. आर्द्रा नक्षत्रातील पाच-सहा पावसांवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे बियाणे दबल्याने दुबार पेरणी करावी लागली. आता गेल्या आठ दिवसांपासून पाऊस नाही. कडक ऊन आणि जोराच्या वाऱ्यामुळे कोवळी पिके सुकू लागली आहेत.

पावसाअभावी पिकांवरील ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंतरमशागत व कोळपणी करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. तसेच १३:००:४५ खताचा वापर करून पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. बाष्पीभवन कमी होईल अशा उपाययोजना केल्यास पिकांना काही प्रमाणात आधार मिळू शकतो.
घनश्याम डोईफोडे, कृषी सहायक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT