हर्षवर्धन सपकाळ Pudhari Photo
बुलढाणा

Harshwardhan Sapkal : सत्ताधारी २१ आमदारांना ठेकेदाराकडून महागड्या कारचे गिफ्ट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा : दिवाळीचे फटाके फुटत असतानाच महाराष्ट्रातील सत्ताधारी २१ आमदारांना एका ठेकेदाराने महागड्या 'डिफेंडर' कार गिफ्ट केल्या आहेत, असा खळबळजनक आरोप कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरूवारी (दि.२३) केला. ते बुलढाणा येथे पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, हे २१ आमदार कोण? आणि गिफ्ट देणारा ठेकेदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. याचे उत्तर लवकर मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक 'डिफेंडर' कार बुलढाण्यात आली आहे. ती या २१ मधील आहे की २२ वी आहे? ते सर्वांमिळून शोधू असेही सपकाळ म्हणाले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा सुचक रोख कुणाकडे होता? हे एकूणच लक्षात आल्याने 'फेव्हेंडर' कारची स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

हा योगायोग? मात्र, विरोधकांना मिळाले आयते खाद्य

बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वाहनांच्या ताफ्यात मागील आठवड्यात एक आलिशान 'लैन्ड रोव्हर फेव्हेंडर' कार दाखल झाली आहे. या महागड्या कारवर संजय गायकवाड यांचे विधानसभा सदस्याचे स्टीकर लावलेले तसेच गायकवाड यांचा फेवरेट असलेला वाहन नंबर '३१३२' हा नव्या फेव्हेंडरला असल्याने गायकवाड यांचे कट्टर विरोधक जिल्हा भाजप अध्यक्ष तथा माजी आमदार विजय हरिभाऊ शिंदे यांनीही तीव्र आक्षेप घेऊन ही कार ठेकेदाराने भेट दिल्याचा आरोप केला होता. ऐन नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांच्या तोंडाशी गायकवाड यांना कात्रीत पकडण्याची संधी शिंदे यांनी साधली. अखेर सारवासारव करत आमदार गायकवाड यांनी ही 'फेव्हेंडर' कार एका नातेवाईक ठेकेदाराने बँकेतून कर्ज काढून प्रेमापोटी आपल्याला वापरायला दिल्याचा खुलासा केला. पण यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आयतेच कोलित मिळाले.

भाजपा जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी 'फेव्हेंडर'ची चर्चा शहरात व मतदारसंघात फिरवली. निवडणूकपूर्व काळात मतदारांची सहानुभूती मिळवण्याऐवजी फेव्हेंडर कार गायकवाड यांच्यासाठी अडचणी वाढवणारी ठरत आहे. अशातच आज (गुरुवारी) कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी २१ आमदारांवर फेव्हेंडर कार घेतल्याचा आरोप करून ऐन दिवाळीत स्फोटक राजकीय धुरळा उडवला आहे. आमदार गायकवाड यांच्याकडील फेव्हेंडर कार ही त्या कथित २१ गिफ्टमधली की स्वतंत्र २२वी? सपकाळ यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT