बुलढाणा येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'चा भव्य संवाद मेळावा पार पडला. Pudhari Photo
बुलढाणा

कितीही विरोध होवो,' लाडकी बहिण योजना' बंद करणार नाही : मुख्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: महिला, भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने"ला विरोधकांनी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तरी ही योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. तुम्ही आम्हाला बळ दिले. तर या योजनेचा निधी १५०० रूपयांवरून तीन हजारांपर्यंतही वाढवत नेऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यात ४० हजारांहून अधिक उपस्थिती असलेल्या लाडक्या बहिणींना आश्वस्त केले.

बुलढाणा शहरातील शारदा ज्ञानपीठच्या मैदानावर आयोजित 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'च्या भव्य संवाद मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री दिलीप वळसे- पाटील आदी उपस्थित होते.

 राजकीय लाभासाठी योजना सुरू केलेली नाही - मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेला विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. या योजनेबाबत अपप्रचारही ते करतात आणि त्यांचे सरकार आल्यास योजना बंद करू, असे सांगत महिला भगिनींचा अपमान करतात. कोणत्याही राजकीय लाभासाठी आम्ही ही योजना सुरू केलेली नाही. या योजनेला विरोध करणारांना त्यांची जागा दाखवा, आणि आम्हाला योग्यवेळी बळ द्या. 'योग्य वेळी' म्हणजे केंव्हा हे तुमच्या लक्षात आले असेलच, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मतदानाविषयी सुचित केले.

वाचाळवीरांनी भाषेची मर्यादा पाळावी - अजित पवार 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हणाले की, लाभाच्या विविध योजना सुरू ठेवायच्या असतील. तर धनुष्यबाण, कमळ, घड्याळाला कौल देण्याचे उपस्थित महिलांना थेट आवाहनच केले. ते पुढे म्हणाले, अलिकडेच काँग्रेसचे एक नेते विदेशात आरक्षणाविषयी बोलले. पण त्यावर प्रतिक्रिया देणा-या वाचाळवीरांनी भाषेची मर्यादा पाळावी, चांगले शब्द वापरावेत. उगाच महायुती सरकारला व घटक पक्षांनाही अडचणीत आणण्याचे काम करू नये.

एक कोटी महिलांना 'लखपती दिदी' करण्याचा संकल्प - फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात एक कोटी महिलांना 'लखपती दिदी' करण्याचा संकल्प आहे. लाडकी बहिण योजनेवर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह उभे करून पाहिले. पण १ कोटी ७ लाख बहिणींच्या खात्यात पैसै जमा झालेत. २ कोटी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ देण्याचा निर्धार आहे. निवडक लाभार्थी महिलांना विविध योजनांचे धनादेश यावेळी वितरित करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी मान्यवरांचे हस्ते शहरात उभारलेल्या विविध महापुरुषांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT