देऊळगाव राजा ः अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील मेरा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतातून हरभऱ्याचे कट्टे चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल केशव मापारी (रा. मेरा बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेतात काढून ठेवलेले हरभऱ्याचे 18 कट्टे (अंदाजे 9 क्विंटल) किंमत सुमारे 72 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 11 मार्च रोजी रात्री 11 वाजेपासून ते 12 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार ज्योत्स्ना सोमवंशी यांनी केली असून पुढील तपास पोलीस नाईक भरत भोपळे करीत आहेत.
दरम्यान, अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतातील पिके, शेती साहित्य व इतर वस्तूंच्या चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
रात्रीची गस्त वाढवावी
सहा-सात महिन्यांत अनेक चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी चोरट्यांचा अद्याप ठोस माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.