विनायक राऊत  (Pudhari Photo)
बुलढाणा

Buldhana Student Death | प्रश्नाचे उत्तर चुकलं, शिक्षकाने भरवर्गात कपडे काढण्यास सांगितलं; मधल्या सुट्टीत दहावीतील विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

नांदूरा तालुक्यातील वसाडी बु. येथील धक्कादायक घटनेवर संतप्त प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

Teacher Harassment Nandura Wasadi Student Death

बुलढाणा: शालेय सत्र सुरू होऊन अवघा एक आठवडा झाला असतानाच वसाडी बु. (ता. नांदूरा) येथे वर्गशिक्षकाच्या छळामुळे एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खळबळजनक घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विवेक महादेव राऊत (वय १५, रा.वसाडी बु.) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर पिंपळगावराजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसाडी बु. येथील एका शाळेत विवेक दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून त्यात, वर्गशिक्षक गोपाल मारोती सुर्यवंशी (रा. खामगाव) यांनी शारीरिक व मानसिक छळ करुन अपमानीत केल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे.

मंगळवारी (दि.१) वर्गशिक्षक गोपाल सुर्यवंशी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे विवेकला अचूक उत्तर देता न आल्याने शिक्षा म्हणून त्याला उठबशा काढण्याचे त्यांनी सांगितले. आपले पाय दुखत असल्याने उठबशा काढण्यास विनायकने नकार दिल्यामुळे शिक्षक सुर्यवंशी यांनी त्याला अंगावरील कपडे काढण्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी पालकांबाबतही अपशब्द वापरले. भरवर्गात शिक्षकाकडून अशाप्रकारे अपमानीत झालेल्या विवेकने अखेर शाळेच्या मधल्या सुट्टीत घरी जाऊन छताला दोरीचा गळफास बांधून जीवन संपविले.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, मृत विवेकच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात शिक्षक गोपाल सुर्यवंशीवर गंभीर आरोप केलेले आहेत. शिक्षकाच्या छळवणुकीमुळे विद्यार्थ्याला १५ व्या वर्षीच जीवन संपवावे लागल्याने विद्यार्थी व पालकांत हळहळ व्यक्त होत आहे. शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT