Buldhana news file photo
बुलढाणा

Buldhana news: कांदा पिकात अवैध अफूची लागवड; १११ किलो जप्त, ४५ लाखांच्या मुद्देमालासह शेतकऱ्याला अटक

कांदा बियाण्यांच्या पिकात अफू पिकाची लागवड केलेल्या शेतावर बुलढाणा एलसीबीच्या पथकाने छापा मारून १११ किलो १३ ग्रॅम अफूचे पीक जप्त केले.

पुढारी वृत्तसेवा

Buldhana news

बुलढाणा: कांदा बियाण्यांच्या पिकात प्रतिबंधित अफू पिकाची लागवड केलेल्या शेतावर आज मंगळवार (दि.३१) पहाटे बुलढाणा एलसीबीच्या पथकाने छापा मारून १११ किलो १३ ग्रॅम वजनाचे (४४ लाख ५३ हजार २०० रू. बाजार मुल्य असलेले) ओलसर अफूचे पीक जप्त केले. याप्रकरणी शेतक-याला अटक केली आहे.

देऊळगावराजा तालुक्यातील धोत्रा नंदई शेतशिवारात ही कारवाई करण्यात आली. याबाबत एलसीबीच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील धोत्रा नंदई शिवारातील गट क्र.३६८ मधील शेतात संजय तुकाराम चेके (५०, रा.सरंबा) या शेतक-याने त्याच्या शेतातील कांदा बियाण्यांच्या पिकामध्ये प्रतिबंधित अफू पिकाची अवैधपणे लागवड केली होती.

तो अफूची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबूलकर यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय प्रताप बाजड, पोहेका दिगंबर कपाटे, पुरूषोत्तम आघाव, महिला पोलीस वनिता शिंगणे, पूजा जाधव, मंगेश भंगाळे, मनोज खरडे, सतीश नाटेकर, समाधान टेकाळे आदी पोलीस पथकाने शेतावर छापा टाकून कारवाई केली.

अंमली औषधी द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियमानुसार अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये संशयिती आरोपी शेतकरी संजय तुकाराम चेके याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT