Buldhana POCSO case
बुलढाणा : ‘पोक्सो’ व इतर गंभीर गुन्हे, ज्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे, अशा एका प्रकरणात मलकापूरच्या विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. गीरी यांच्या न्यायालयाने आरोपीला प्रथमच जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार पीडित अल्पवयीन विवाहित माता व तिच्या नवजात बाळाला मोठा दिलासा मिळाला आहे.
‘पोक्सो’च्या गुन्ह्यात स्थानिक सत्र न्यायालयात जामीन मिळण्याचे हे दुर्मिळ प्रकरण आहे. ज्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असते, त्यामध्ये प्रथम प्रकरणाचा संपूर्ण तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतरच जामीन अर्ज मंजूर होऊ शकतो.
धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका प्रकरणात लैंगिक शोषणापासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ (पोक्सो) व भारतीय न्यायसंहिता कलम ४ व ६, तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ अंतर्गत विविध गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. अल्पवयीन मुलीशी लग्न आणि त्यानंतर झालेले बाळ या पार्श्वभूमीवरील हे प्रकरण आहे.
संशयीत आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याऐवजी अल्पवयीन पीडित मातेच्या उदरनिर्वाहाचा आणि नवजात शिशूच्या संगोपनाचा प्रश्न नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार समोर ठेवत आरोपीला जामीन देण्याचा सत्र न्यायालयाने दिलेला हा निकाल न्यायालयीन क्षेत्रात महत्त्वपूर्ण समजला जात आहे. प्रचलित ‘पोक्सो’ कायद्यानुसार आरोपीला जामीनासाठी उच्च न्यायालयात दाद मागावी लागत असते. या प्रकरणात अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी युक्तिवादामध्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे विविध दाखले मांडले.
१ ऑगस्ट २०२६ रोजी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात एका अल्पवयीन विवाहितेची प्रसूती होऊन तिने बाळाला जन्म दिला. जन्मतारखेच्या पडताळणीनंतर तिचे वय १८ वर्षांहून कमी असल्याचे समोर आल्याने रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना कळवले. यावर धामणगाव बढे पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, पीडित अल्पवयीन मुलगी ही मुळची जामू, जि. बैतूल (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून तिचा प्रेमविवाह फर्दापूर, ता. मोताळा येथील पवन भाऊराव ससाणे याच्यासोबत १२ मे २०२५ रोजी कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाला होता. त्यावेळी तिचे वय १६ वर्षे ९ महिने होते.
पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार व ‘पोक्सो’ आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार मुख्य आरोपी पवन ससाणे, त्याचे आई-वडील आणि पीडित मुलीची आई अशा चौघांवर गुन्हे दाखल करून पवन याला अटक केली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, आरोपी पवन याच्या जामीनासाठी मलकापूरच्या विशेष व सत्र न्यायालयात दाद मागताना त्याच्या वकिलांनी सव्वा महिन्याच्या नवजात बाळाच्या संगोपनाचा आणि पीडित मातेच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मांडला. न्यायालयाने नवजात बाळ व त्याच्या मातेचा नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार विचार करून आरोपी पवन ससाणे याला जामीन मंजूर केला आहे.