बुलढाणा : महाराष्ट्राच्या आणि विशेषतः बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा समावेश ‘तिसऱ्या १०० जागतिक भूगर्भीय वारसा स्थळांच्या’ यादीत करण्यात आला आहे. भारत सरकारच्या खाण मंत्रालयाने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली असून, हा जागतिक बहुमान मिळवणारे लोणार सरोवर हे देशातील केवळ दुसरेच स्थळ ठरले आहे.
इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेस या जागतिक संस्थेमार्फत जगभरातील अद्वितीय भूगर्भीय स्थळांची निवड केली जाते. जानेवारी २०२६ मध्ये बोगोटा (कोलंबिया) येथे झालेल्या 'आययुजीएस' च्या ८२ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत लोणारच्या नावाला प्राथमिक मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर, नुकत्याच पोर्तुगालमधील अल्गार्वे येथे पार पडलेल्या ‘आययुजीएस जिओहेरिटेज इव्हेंट २०२६’ मध्ये लोणार सरोवराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यापूर्वी २०२२ मध्ये मेघालयातील ‘मावमलुह लेणी’ या स्थळाचा पहिल्या यादीत समावेश झाला होता.
उल्कापातातून झालेली अद्वितीय निर्मिती
सुमारे ५०,००० वर्षांपूर्वी बेसाल्ट खडकावर झालेल्या प्रचंड वेगाच्या उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली आहे. बेसाल्ट खडकात तयार झालेले हे जगातील एकमेव मोठे खाऱ्या आणि अल्कधर्मी पाण्याचे विवर आहे. या सरोवराला यापूर्वीच ‘रामसर स्थळ’ आणि ‘राष्ट्रीय भूगर्भीय वारसा स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या जागतिक दर्जामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना व नवी दिशा मिळणार आहे. जागतिक नकाशावर नाव कोरले गेल्याने देश-विदेशातील पर्यटक आणि अभ्यासकांची संख्या वाढेल, ज्यातून स्थानिक तरुणांना हॉटेल, वाहतूक आणि गाईड व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. लोणारमधील खडक आणि मातीचे गुणधर्म चंद्राशी मिळतेजुळते असल्याने ‘नासा’ आणि ‘इस्रो’सह जगभरातील संशोधकांना येथे अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळेल. याशिवाय, सरोवराचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष निधी उपलब्ध होईल आणि भविष्यात लोणारला ‘युनेस्को जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.