Khagol Darshan Mahotsav Buldhana Pudhari
बुलढाणा

Lonar Lake Festival : लोणार सरोवर परिसरात २४ ते २६ एप्रिल दरम्यान 'खगोल दर्शन महोत्सव

'डार्क स्काय' उपक्रमातून अवकाशाचे रहस्य उलगडणार

पुढारी वृत्तसेवा

Khagol Darshan Mahotsav Buldhana

बुलढाणा : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि 'आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताहा'च्या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे २४ ते २६ एप्रिल दरम्यान 'खगोल दर्शन महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित हा महोत्सव पर्यटकांना अवकाशाचे विलोभनीय दर्शन घडवणार आहे.

लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले अद्वितीय सरोवर आहे. येथील परिसर प्रकाश प्रदूषणापासून मुक्त असल्याने 'डार्क स्काय' संवर्धनासाठी अत्यंत अनुकूल आहे. या महोत्सवांतर्गत स्टारगेझिंग (आकाश निरीक्षण): तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना नक्षत्र, ग्रह आणि ताऱ्यांचे जवळून निरीक्षण करता येणार आहे.

प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि नैसर्गिक अंधाराचे महत्त्व सांगणारे प्रदर्शन व माहितीपट यावेळी दाखवले जाणार आहेत. निसर्ग संवर्धन आणि विज्ञानाची सांगड घालून खगोल पर्यटनाला ('अॅस्ट्रोटुरिझम')चालना देणे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.

पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव होणार आहे. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आणि पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. 'अॅस्ट्रोइनॅरा'च्या संस्थापिका श्वेता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्टारगेझिंग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोणारचा प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावा यासाठी येथे विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये 'एमटीडीसी' पर्यटक निवास, पर्यटक अभ्यागत केंद्र, तारांगण, प्रयोगशाळा आणि योग केंद्राचा समावेश आहे.

लोणारमधील हा उपक्रम केवळ खगोलशास्त्रापुरता मर्यादित नसून तो पर्यावरणाशीही निगडित आहे. शाश्वत पर्यटनाला यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास प्रधान सचिव संजय खंदारे यांनी व्यक्त केला . या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT