अवैध वाळू उत्खनन आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या पाच टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. Pudhari
बुलढाणा

Buldhana Illegal Sand : वाळूची अवैध वाहतूक करणारे ५ टिप्पर पकडले; ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदूरा तालुक्यातील सावरगाव नेहू परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि चोरटी वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

Buldhana Five Tippers Seized

बुलढाणा : नांदूरा तालुक्यातील सावरगाव नेहू परिसरात अवैध वाळू उत्खनन आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या पाच टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १० ब्रास वाळूसह पाच टिप्पर जप्त करण्यात आले असून एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची विशेष पथके सक्रिय झाली आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि. २१ मे) रात्री सावरगाव नेहू परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक सुनील अंबूलकर, पीएसआय पंकज सपकाळे तसेच पोहेकॉ. वनिता शिंगणे, अमोल शेजोळ, मनोज खरडे, अजीज परसूवाले आणि शिवानंद हेलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे पाच टिप्पर अडवून तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे १० ब्रास वाळू आढळून आली.जप्त करण्यात आलेल्या पाच टिप्परची किंमत सुमारे ७५ लाख रुपये असून वाळूची किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी टिप्पर चालक योगेश विजय काळे (रा. बेलाड, ता. मलकापूर), लक्ष्मण धोंडू चव्हाण (रा. नेहरूनगर, ता. मोताळा), आकाश सुरेश कंडारकर (रा. झोडगा, ता. मलकापूर), प्रल्हाद सुपडा नरवाडे (रा. मेंढळी, ता. मोताळा) आणि शुभम माणिक इंगळे (रा. धरणगाव, ता. मलकापूर) यांच्याविरोधात नांदूरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच गौणखनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच रात्री पाच टिप्परवर झालेल्या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT