Purna River Sand Mining
बुलढाणा : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाच्या धडक कारवाया सुरु आहेत. मलकापूर तालुक्यातील मौजा नरवेल परिसरातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ८ टिप्पर व १६ ब्रॉस वाळू जप्त करण्यात आली. एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केली.
एमआयडीसी पोलीस स्टेशन मलकापूर हद्दीतील नरवेल कोटेश्वर मंदिर शिवारात पेट्रोलिंग सुरू असताना जमुनापुरी घाटातून मलकापूरकडे शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने तहसीलदार व महसूल कर्मचाऱ्यांसह पंचांना सोबत घेऊन नाकाबंदी केली.
या नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या येणारे ८ टिप्पर वाहने अडवून तपासणी केली असता, चालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे आढळून आले. प्रत्येक टिप्परमध्ये २ ब्रॉस वाळू अशी एकूण १६ ब्रॉस वाळू (अंदाजे किंमत २ लाख रुपये) तसेच प्रत्येकी अंदाजे २० लाख रुपये किमतीची ८ टिप्पर वाहने जप्त करण्यात आली.एकूण वाळू व वाहनांसह १ कोटी ६२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पो.स्टे.मध्ये मलकापूर येथील ६ तर नांदुरा व मोताळा येथील प्रत्येकी एका आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.