Accused Escaped Buldhana AI Photo
बुलढाणा

Buldhana Crime | रुग्णालयाच्या शौचालयाची खिडकी तोडून आरोपी फरार; सहा तासांत जेरबंद

भुसावळ येथील दिपनगर परिसरातून आरोपीला त्याच्या भावासह दुचाकीवरून जाताना घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Accused Escaped Buldhana

बुलढाणा : पोलिसांच्या ताब्यातील उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेला आरोपी शौचालयाची खिडकी तोडून फरार झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासांत भुसावळ येथील दिपनगर परिसरातून आरोपीला त्याच्या भावासह दुचाकीवरून जात असताना ताब्यात घेतले.

प्रतापसिंग सुरजसिंग बावरी (१९) आणि कपूरसिंग सुरूपसिंग बावरी (२४), दोघेही रा. म्हाडा कॉलनी, मलकापूर, यांना रविवारी (६ सप्टेंबर) मलकापूर येथील दसरखेड एमआयडीसी परिसरात तार चोरी करताना नागरिकांनी पकडले होते. नागरिकांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. मारहाण झाल्याने उपचारासाठी त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रविवारी रात्री सुमारे तीनच्या सुमारास प्रतापसिंग याने शौचालयात जाण्याची परवानगी मागितली. तो बराच वेळ बाहेर न आल्याने कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याला संशय आला. तपासणी केली असता शौचालयाची खिडकी तोडून प्रतापसिंग पसार झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी रुग्णालयातून फरार झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ शोधमोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी हा त्याचा भाऊ तुफानसिंग बावरी याच्यासोबत दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी माग काढत दिपनगर परिसरात सापळा रचला. यावेळी दुचाकीवरून जात असलेल्या प्रतापसिंग आणि तुफानसिंग यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपीच्या फरारीनंतर अवघ्या सहा तासांत त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याने शोधमोहीम यशस्वी ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT