Earthquake AI Generated Image
बुलढाणा

Buldhana Earthquake | बुलढाण्यात भूकंपाचे सौम्य धक्के; मलकापूर, संग्रामपूर, नांदुरा हादरले!

मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

Malkapur Sangrampur Nandura Earthquake

बुलढाणा : मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात शनिवारी (दि. १४) सकाळी ९.१५ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे सौम्य धक्के बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरासह तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये तसेच संग्रामपूर आणि नांदुरा तालुक्यांतील परिसरात जाणवले. अचानक जाणवलेल्या धक्क्यांमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात असून त्याची खोली जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर होती. मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांत या भूकंपाचे सौम्य पडसाद उमटले.

भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. संबंधित तहसीलदारांनी तलाठी आणि ग्रामस्तरीय यंत्रणेमार्फत गावांमधील परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक चौकशीत जिल्ह्यात कुठेही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे आढळून आले नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

भूकंपाच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी?

भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता शांत राहावे. घरात असताना मजबूत टेबल किंवा पलंगाखाली आश्रय घ्यावा. खिडक्या, काचा आणि जड वस्तूंपासून दूर राहावे. भूकंपाचे धक्के थांबल्यानंतर इमारतीबाहेर पडून मोकळ्या जागेत सुरक्षित ठिकाणी थांबावे. इमारतीतून बाहेर पडताना लिफ्टचा वापर टाळून पायऱ्यांचा वापर करावा. शक्य असल्यास घराबाहेर पडण्यापूर्वी मुख्य वीजपुरवठा आणि गॅस रेग्युलेटर बंद करावा.

आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार (मो. ७०२०४३५९५४) किंवा तहसीलदार, मलकापूर (मो. ८९७५८७४५८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT