Buldhana District Bank Election Sahakar Panel Victory
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’ने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. बँकेच्या २१ संचालक पदांपैकी १२ जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित नऊ जागांसाठी रविवारी मतदान झाले. सोमवारी (दि.२४) झालेल्या मतमोजणीत सहकार पॅनलने सात, तर आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ने दोन जागा जिंकल्या.
यामुळे जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १९ जागांवर सहकार पॅनल, तर दोन जागांवर शेतकरी परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
मतमोजणीनंतर सहकार पॅनलचे विजयी झालेले सात उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत :
ओबीसी मतदारसंघ : गोविंदराव गणपत मिरगे
अ.जा./अ.ज. मतदारसंघ : डॉ. संजय रायमुलकर
इतर सहकारी संस्था मतदारसंघ : सुनील राजाराम उदयकार
महिला मतदारसंघ : अस्मिता प्रदीप हेलगे आणि पुष्पा रामदास बारवकर
लोणार कृषी सेवा सोसायटी मतदारसंघ : गोविंद शेषराव मापारी
संग्रामपूर कृषी सेवा सोसायटी मतदारसंघ : श्रीकांत दादाराव मारोडे
‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’चे दोन उमेदवार विजयी झाले. यामध्ये मलकापूर कृषी सेवा सोसायटी मतदारसंघातून शिवचंद्र तायडे, तर नागरी बँका-पतसंस्था-वैयक्तिक सभासद मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील यांनी विजय मिळवला.
सहकार पॅनलचे १२ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये मेहकर कृषी सेवा सोसायटी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कृषी प्रक्रिया व पणन मतदारसंघातून कामगार मंत्री आकाश फुंडकर, मोताळा कृषी सेवा सोसायटी मतदारसंघातून आमदार संजय गायकवाड, सिंदखेड राजा कृषी सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.
तसेच व्हिजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवत, जळगाव जामोदमधून प्रसनेजित पाटील, शेगावमधून पांडुरंग पाटील, नांदुरा मतदारसंघातून राजेश देशमुख, बुलढाणा मतदारसंघातून मयूर बाहेकर, खामगावमधून दिनेश काळणे, चिखलीमधून अंकुशराव पडघान आणि देऊळगाव राजा मतदारसंघातून कावेरी सोनसळे यांचा समावेश आहे.
या निवडणुकीत काही राजकीय आणि कौटुंबिक समीकरणेही चर्चेत आली आहेत. पांडुरंग पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील हे सख्खे भाऊ असून ते वेगवेगळ्या पॅनलमधून निवडून आले आहेत. तसेच आमदार संजय गायकवाड आणि मयूर बाहेकर ही सासरे-जावयाची जोडीही जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आली आहे.
भाजप आमदार श्वेताताई महाले यांचे वडील आणि जिल्हा बँकेचे माजी कृषी अधिकारी अंकुशराव पडघान हेदेखील संचालक मंडळावर निवडून आले आहेत.
जिल्हा सहकारी बँकेच्या या निवडणुकीत २१ पैकी तब्बल १७ संचालक प्रथमच बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आले आहेत. १९ जागांवर विजय मिळवत सहकार पॅनलने जिल्हा बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले आहे.