

Cooperative Bank Elections
बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या उर्वरित नऊ जागांसाठी रविवार (दि. २३) जिल्ह्यातील १३ तालुकास्तरीय मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ आणि ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’ यांच्यात अटीतटीची लढत रंगली आहे. बँकेच्या संचालकपदाच्या १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित नऊ जागांसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
यामध्ये ‘सहकार पॅनल’चे आठ, ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’चे सात, तर आठ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सहकार पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला काही जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत आश्वासन देत ठेवून अखेर पक्षाला डावलण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’चे सात उमेदवार मैदानात उतरविले. त्यामुळे सहकार पॅनलसमोर या पॅनलने थेट आव्हान उभे केले आहे.
महिला आरक्षित, ओबीसी आरक्षित आणि अनुसूचित जाती-जमाती आरक्षित या तीन मतदारसंघांत प्रत्येकी १,९२१ मतदार आहेत. नागरी बँका-पतसंस्था-वैयक्तिक मतदारसंघात १,२८७ मतदार आहेत. इतर सहकारी संस्था मतदारसंघात ४३, लोणार कृषी सेवा सोसायटी मतदारसंघात ३७, मलकापूर कृषी सेवा सोसायटी मतदारसंघात ३०, तर संग्रामपूर कृषी सेवा सोसायटी मतदारसंघात २६ मतदार आहेत.
नागरी बँका-पतसंस्था-वैयक्तिक मतदारसंघात ज्ञानेश्वर पाटील आणि चंद्रशेखर संचेती यांच्यात लढत आहे. इतर सहकारी संस्था मतदारसंघात उज्ज्वलाताई गणेश मोरे आणि सुनील उदयकार आमनेसामने आहेत.
ओबीसी आरक्षित मतदारसंघात मनोज दांडगे, गोविंद मिरगे, गजानन मामलकर आणि वसंत घोंगडे हे चार उमेदवार रिंगणात आहेत. महिला आरक्षित मतदारसंघातील दोन जागांसाठी प्रतिभा टाले, मंदाकिनी पाटील, अस्मिता हेलगे, पुष्पाताई बारवकर आणि अर्पिता विजयराज शिंदे यांच्यात सामना होत आहे.
अनुसूचित जाती-जमाती आरक्षित मतदारसंघात माजी आमदार संजय रायमुलकर आणि योगेश मयाजी गायकवाड यांच्यात थेट लढत आहे. लोणार कृषी सेवा सोसायटी मतदारसंघात शिवनंदा खंड आणि गोविंद मापारी यांच्यात सामना आहे.
मलकापूर कृषी सेवा सोसायटी मतदारसंघात शिवचंद्र तायडे, संतोष रायपुरे आणि ज्ञानदेव वाघोदे हे तीन उमेदवार नशीब आजमावत आहेत. तर संग्रामपूर कृषी सेवा सोसायटी मतदारसंघात श्रीकांत मारोडे, विश्वनाथ झाडोकार आणि सुभाष चांदूरकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’च्या प्रचारफितीत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बुलढाणा जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणींचा संदर्भ देत, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी बँकेला ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मंजूर केले होते, अशी आठवण करून दिली आहे.
त्यानंतरच बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बँकेच्या निवडणुकीत डावलण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे मतदानाच्या पूर्वसंध्येला दोन्ही पॅनलमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, उद्याच्या मतदानाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.