बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा
पोलिसांच्या वर्दीचा आदर करा, त्यांचे प्रतिमा हनन होऊ देऊ नका. भावनेच्या भरात वाहत जाऊन संपूर्ण पोलीस दलावर बोलू नका. पोलीस रात्रंदिवस राबतात म्हणूनच नागरिक शांतता, सुरक्षितता अनुभवतात व सण, उत्सव साजरे करू शकतात. खटकणारे काही लोक सर्वच क्षेत्रात असतात, परंतू संपूर्ण क्षेत्राला जबाबदार धरता येणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
पोलिसांबाबत काही तक्रार असल्यास ती माझ्याकडे करायला हवी होती. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रविवारच्या दुपारी बुलढाणा येथे शिवसेनेच्या आभार यात्रेच्या भव्य जाहीर सभेत त्यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांना जाहिरपणे समज दिली.
आमदार गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत पोलिस दलाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलिस दलात खळबळ उडून अस्वस्थता पसरली होती. याची गंभीरतेने दखल घेऊन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना समज द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.त्यानंतर शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी आमदार संजय गायकवाड यांच्याकडे त्या वक्तव्याबाबत नाराजीही व्यक्त केली होती.
त्याचवेळी गृहमंत्रालयाकडून संकेत मिळाल्यानंतर बुलढाणा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बुलढाणा दौ-याच्या एकदिवस पूर्व झालेल्या या घडामोडींनंतर आमदार हे गायकवाड बैकफूटवर आले."महाराष्ट्र पोलीस "असा उल्लेख आपल्याकडून चुकून झाला, वैयक्तिक अनुभवावरून स्थानिक पोलिसांबाबत आपण तसे बोललो होतो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न आमदार गायकवाड यांनी सकाळी माध्यम प्रतिनिधींसमोर केला.
दुपारी बुलढाण्यातील शिवसेनेच्या आभार यात्रेच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाष्य करत त्यांना जाहिरपणे समज दिली. सभेनंतर याच विषयाची राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. आभार यात्रेच्या जाहिर सभेच्या मंचावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड व आमदार संजय गायकवाड उपस्थित होते.