

MLA Sanjay Gaikwad controversial statement
बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा :
पोलीस खात्याविषयी अपशब्द वापरुन वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या बुलढाणा दौ-याच्या पूर्वसंध्येला आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गृहखात्याची सक्रियता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या 'आभार यात्रे'साठी रविवार २७ रोजी बुलढाणा दौ-यावर येत आहेत. या दौ-याविषयी माहिती देण्यासाठी आमदार गायकवाड यांनी शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस खात्याविषयी अपशब्दाची मुक्ताफळे उधळली होती.
अवैध धंद्यावर कारवाई करून ते हप्ता वाढवून घेतात.पोलीस चोरांचे पार्टनर आहेत, पाच लाखाची रक्कम पन्नास हजार दाखवतात. अशा आशयाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती.
महायुतीच्या घटक पक्षातील आमदारानेच पोलीस दलाविषयी असे वक्तव्य केल्याची बाब विविध माध्यमांतून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचल्यावर शनिवारी दुपारी फडणवीस यांनी," आमदार गायकवाड वादग्रस्त वक्तव्य करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करु" अशी प्रतिक्रिया दिली होती.
त्यानंतर काही तासांतच गृहखात्याकडून संकेत मिळाल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा रविवारी बुलढाण्यात दौरा आहे. तत्पूर्वीच गृहखात्याने आमदार गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची अशी तत्परतेने दखल घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.