Buldhana cyber police recover 9.94 lakh (Pudhari Photo)
बुलढाणा

Buldhana Cyber Crime | बुलढाणा: ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील 9.94 लाख परत मिळवले; सायबर पोलिसांची कामगिरी

सीबीआय व ट्राई विभागाच्या नावाने धमकी देत आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून १० लाख रुपये ऑनलाईन भरावयास लावून फसवणूक केली होती

पुढारी वृत्तसेवा

Buldhana cyber police recover 9.94 lakh

बुलढाणा : सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर समजल्या जाणाऱ्या "डिजिटल अरेस्ट" फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. तक्रारदार विनोद उत्तमराव साळोक (वय ४२) व त्यांच्या पत्नीस सीबीआय व ट्राई विभागाच्या नावाने धमकी देत त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून १० लाख रुपये ऑनलाईन भरावयास लावून फसवणूक करण्यात आली होती.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दि.२० ते २४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे डिजिटल अरेस्टची भीती दाखवून एक्सीस बँक मधील ग्लोबल टिंबर्स नावाच्या खात्यात आरटीजीएसद्वारे १० लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी सायबर पोलीस स्टेशन, बुलडाणा येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तत्काळ संबंधित बँकांना पत्रव्यवहार करून आरोपींच्या खात्यांची तांत्रिक तपासणी सुरू केली. फसवणूक केलेले पैसे विविध खात्यांत वळविण्यात आले असल्याचे समोर आले. तपास पथकाने त्वरित ही सर्व खाती गोठविण्याची प्रक्रिया केली. आरोपींनी वळवलेली तक्रारदारांची रक्कम मिझोराम राज्यातील एका बँक खात्यात गेल्याचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे निदर्शनास आले. तत्काळ कारवाई करत त्या खात्यातील तब्बल ९ लाख ९४ हजार ३०० रुपये रक्कम गोठवून न्यायालयाच्या आदेशानुसार ती तक्रारदारांच्या बँक खात्यात दि. १२ नोव्हेंबर रोजी परत मिळवून देण्यात आली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर,तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, सपोनि प्रमोद इंगळे यांच्या पथकाने केली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आवाहन केले की, "डिजिटल अरेस्ट"अशा स्वरुपाचा कोणताही प्रकार नसतो. पोलीस किंवा कोणतेही डिपार्टमेंट व्हॉट्सअॅपव्दारे कॉल किंवा व्हिडीओ कॉल करुन अटक करत नाही. त्यामुळे अनोळखी नंबरवरुन येणारे व्हॉट्सअॅप कॉल किंवा व्हिडीओ कॉल आल्यास नागरिकांनी त्यास प्रतिसाद देवू नये. तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 किंवा 1945 या क्रमांकावर वेबसाईटवर तक्रार नोंदवावी. तसेच शक्य असल्यास तात्काळ नजीकचे पोलीस स्टेशन अथवा सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT