बुलडाणा : जिल्हा कोषागार कार्यालयात कुटूंब निवृत्तीवेतनाचा प्रलंबित असलेला प्रस्ताव व हक्काची थकित असलेली रक्कम मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडून १५ हजार रूपयांची लाच स्विकारताना अप्पर कोषागार अधिकारी व दोन लिपिकांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.आज शुक्रवार २७ फेब्रूवारी रोजी ही कारवाई करण्यात आली.
एकाचवेळी तीघे एसीबीच्या सापळ्यात अडकल्याने कोषागार कार्यालय परिसरात खळबळ उडाली. याबाबत एसीबीच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस विभागातील एका सेवानिवृत्त कर्मचा-याचे वर्ष २०२५ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात पत्नीला कुटूंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन दाखल केलेल्या प्रस्तावाची फाईल जिल्हा कोषागार कार्यालयात प्रलंबित होती.
याबाबत कार्यालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी लाच घेण्याच्या लालसेने अपर कोषागार अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्थ असलेल्या कनिष्ठ लेखापाल व लेखा लिपिक अशा तीघांनी संगनमत करून संबंधित प्रस्तावात वारंवार त्रुटी काढून अडवणूक केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) बुलडाणा कडे तक्रार नोंदवली.
त्यानुसार, एसीबीने गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी लाचेच्या रक्कमेबाबत तडजोड होऊन १५ हजार रूपये लाच घेण्याचे ठरले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवार २७ फेब्रूवारी रोजी कोषागार कार्यालयात कारवाईसाठी सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच घेतांना अप्पर कोषागार अधिकारी प्रविण गोविंदराव मोंढे (४५),कनिष्ठ लेखापाल विनोद अंबादास घट्टे (४३),लेखा लिपिक जीवन पांडूरंग काळे(३४) हे तीघेही एसीबीच्या सापळ्यात अडकले.याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे उपअधिक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार व विलास गुसिंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.