

Mehkar Opium seizure
बुलढाणा : मेहकर तालुक्यातील पांग्री काटे शिवारात प्रतिबंधित अंमली पदार्थ अफूची चोरटी लागवड केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपयांचे अफू पीक जप्त केले. या प्रकरणी दोन शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
सोमवार, दि. १६ फेब्रुवारीच्या रात्री मेहकरचे एसडीपीओ संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने फॉरेन्सिक तज्ज्ञ व अंमली पदार्थ शोधक श्वान पथकासह पांग्री काटे शिवारात छापा टाकला. गट क्रमांक १२८ आणि १४८ मधील शेतजमिनीत अफूची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी झाडे, बोंडे व पाने असा एकूण १६४ किलो ९८० ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईदरम्यान भागवत सदाशिव काटे यांच्या शेतातून १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाचे अफू पीक (अंदाजे किंमत ८६ लाख १२ हजार ८०० रुपये) जप्त करण्यात आले, तर विशाल रमेश काटे यांच्या शेतातून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाचे अफू पीक (अंदाजे किंमत ४५ लाख ८५ हजार ६०० रुपये) हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ संतोष खाडे, एपीआय गजानन करेवाड, पीएसआय गणेश कड, पोहेका डिगांबर चव्हाण, सुनिल देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.