संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी काँग्रेसने आयोजिलेल्या 'पुस्तक वाचनाच्या वेळी आंदोलनस्थळी येऊन निदर्शने केली Pudhari
बुलढाणा

Buldhana Congress Protest : काँग्रेसच्या 'पुस्तक वाचन' कार्यक्रमालाही आमदार गायकवाड समर्थकांचा विरोध; दोन्ही गट आमनेसामने

पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा संघर्ष टळला

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Gaikwad vs Congress

बुलढाणा : भाकप व पुरोगामी संघटनांनी आयोजिलेल्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला आक्षेप घेऊन जोरदार निदर्शने करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांनी बुधवारी (दि.२९) काँग्रेसने आयोजिलेल्या 'पुस्तक वाचनाच्या वेळीही आंदोलनस्थळी येऊन निदर्शने करत आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला.

परंतू मंगळवारच्या आंदोलनावेळी दडपशाही केल्याचा आरोप झालेल्या पोलिसांनी आज परिस्थिती कुशलतेने हाताळल्याने संभाव्य संघर्ष टळला. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे सामूहिक वाचन युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, संदिप शेळके, दत्ता काकस यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी स्थानिक संगम चौकातील शिवस्मारकासमोर सुरू होते.

पुस्तक वाचनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख व्हायला नको अशी भूमिका घेत आमदार गायकवाड यांच्या समर्थकांनी काँग्रेसच्या आंदोलनस्थळी येत जोरदार निदर्शने करुन 'पुस्तक वाचन 'उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी प्रत्युत्तरादाखल काँग्रेस कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने संगम चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संघर्ष वाढण्याची चिन्हे पाहून पोलिस अधिका-यांनी मध्यस्थी करत काँग्रेस कार्यकर्त्यांना समजावले. तर पोलिसांच्या फौजफाट्याने गायकवाड समर्थकांना तेथून परतवून लावले. यामुळे संभाव्य संघर्ष टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT