Chikhli Lonar Youth Killed
बुलढाणा : दीड लाख रुपयांची सुपारी देऊन चिखली तालुक्यातील तरुणाला लोणार येथे जेवणाच्या वेळी दारूत विष मिसळून पाजल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर मृतदेह सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव शिवारातील शेतात फेकून देण्यात आला. या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या पाच तासांत छडा लावत चार संशयितांना जेरबंद केले. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेगाव (ता. चिखली) येथील उमेश रमेश परिहार ( वय ३८) हा ९ सप्टेंबररोजी आपल्या मुलांना भेटण्यासाठी मडाखेड येथे गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. दरम्यान, ११ सप्टेंबररोजी उमेशचे वडील रमेश सांडुसिंग परिहार यांना मुलाचा मृतदेह तढेगाव रस्त्यालगत घनशाम कुटे यांच्या सोयाबीनच्या शेतात आढळल्याची माहिती मिळाली.
उमेशच्या चेहऱ्यावर सूज होती. त्याच्या नाकातून व तोंडातून रक्त आले होते, तसेच डोक्याला मुका मार लागल्याचे दिसून आले. यानंतर उमेशचे वडील रमेश परिहार यांनी गणेश राजपूत याने साथीदारांच्या मदतीने मुलाचा घातपात केल्याचा संशय व्यक्त करत किनगावराजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
तांत्रिक तपासातून आरोपींपर्यंत पोहोचले
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे, पीएसआय प्रताप बाजड आणि किनगावराजा पोलिस ठाण्याचे एपीआय संजय मातोंडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भौतिक आणि तांत्रिक तपास सुरू केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या पाच तासांत चार संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश मोतीसिंग राजपूत (३९), सागर प्रकाश पवार (५०), दोघेही रा. उतरादा, ता. चिखली, नईमखाँ उमरखाँ पठाण (५०, रा. ईसोली, ता. चिखली) आणि गणेश पुंजाजी काळे (४२, रा. सरस्वती, ता. लोणार) यांचा समावेश आहे.
जुन्या वादातून कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
पोलिस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमेश परिहार आणि गणेश राजपूत यांच्यात जुना वाद होता. या वादातून गणेश राजपूत याने उमेशचा कायमचा काटा काढण्याचे ठरविल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी सागर पवारच्या माध्यमातून नईमखाँ पठाण आणि गणेश काळे यांना कथितरित्या दीड लाख रुपयांची सुपारी देण्यात आली.
९ सप्टेंबर रोजी गणेश राजपूत आणि गणेश काळे यांनी उमेशला सोबत घेतले. वाटेत साखरखेर्डा येथून सागर पवार आणि नईमखाँ पठाण यांनाही सोबत घेत चौघे लोणार येथे गेले. तेथे सर्वांनी जेवण केले. यावेळी उमेशला दारू पाजण्यात आली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दारूची नशा चढल्यानंतर गणेश काळे याने उमेशच्या दारूच्या बाटलीत विष मिसळले. त्यानंतर उमेशचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह तढेगाव शिवारातील शेतात टाकून देण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामुळे या खुनाचे गूढ उकलले असून, चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास किनगावराजा पोलिस करीत आहेत.