Brutal murder of 25-year-old youth in Andhera, three arrested
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा : अंढेरा बाजारगल्लीत शनिवार (दि. २५) रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान किरकोळ वादातून तिघा जणांनी २५ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याची निघृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही घटना अंढेरा पोलिस ठाण्यापासून केवळ काही अंतरावरच घडल्याने "कायद्याचा धाक संपत चाललाय का?" असा प्रश्न जनतेतून व्यक्त केला जात आहे.
मृत तरुण आकाश उत्तम चव्हाण हा चिखली तालुक्यातील आसोला गावचा रहिवासी असून, आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त अंढेराला आला होता. किरकोळ कारणावरून झालेला वाद क्षणातच रक्तरंजित स्वरूपात बदलला आणि धारदार शस्त्राने वार झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एपीआय रुपेश शक्करगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह अचलपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय अधिकारी संतोष खाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे, त्यापैकी दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. रविवार (दि. २६) रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.
मृतकाच्या हत्येची वार्ता समजताच आसोला गावातील नागरिक मोठ्या संख्येने अंढेरा पोलिस ठाण्यात जमले. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मेहकर येथील दंगा काबू पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अंढेरा ठाण्याला छावणीचे स्वरूप देण्यात आले असून पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवला आहे.