Andhera Primary Health Centre pudhari photo
बुलढाणा

Andhera Primary Health Centre : अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णसेवा सलाईनवर

33 मंजूर पदांपैकी 14 रिक्त; 19 कर्मचारी कार्यरत, रुग्णांची अडचण

पुढारी वृत्तसेवा

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था ‌‘सलाईनवर‌’ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परिसरातील तब्बल 30 गावांतील सुमारे 52 हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या या केंद्रात 33 मंजूर पदांपैकी 14 पदे रिक्त असून केवळ 19 कर्मचाऱ्यांच्या भरोशावर संपूर्ण कारभार सुरू आहे. वाढते तापमान, उष्माघाताचे रुग्ण आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेला पावसाळा यामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण निर्माण होणार आहे.

अंढेरा हे तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जवळपास 30 गावांतील नागरिक अवलंबून आहेत. मात्र आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेकदा कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असून ओव्हरटाईम ड्युटी करावी लागत आहे. काही वेळा कर्मचारी अपुरे असल्याने दवाखाना व्यवस्थापनावरही परिणाम होत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 33 पदे मंजूर असताना 14 पदे रिक्त आहेत. दोन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकच अधिकारी कार्यरत आहे. आरोग्य सेविका, परिचारक, सहाय्यक तसेच इतर महत्त्वाच्या पदांवरील रिक्त जागांमुळे आरोग्य सेवा कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत आहेत.विशेष म्हणजे चार परिचरांची पदे रिक्त आहेत. आरोग्य सेविका व आरोग्य सेवकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यात अडचणी येत आहेत.

परिणामी अनेक रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भार सहन करावा लागत आहे.सध्या परिसरात 42 अंश सेल्सियसच्या आसपास तापमान नोंदविले जात आहे. उष्माघात, ताप, संसर्गजन्य आजारांची संख्या वाढत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुरे मनुष्यबळ ही चिंतेची बाब ठरत आहे.

काही दिवसांत पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंग्यू, मलेरिया, अतिसार यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने तातडीने रिक्त पदे भरून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.अंढेरा परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात करणारे लोकप्रतिनिधी आरोग्यासारख्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. “लोकप्रतिनिधी केवळ मतदान घेण्यासाठीच आहेत का?“ असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त पदभार एप्रिल 2024 पासून सांभाळत आहे. चार परिचर, दोन वैद्यकीय अधिकारी आणि सहा आरोग्य सेविकांची पदे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. सध्या एक बॉण्डवर वैद्यकीय अधिकारी आहे पण परमनंट नाही. त्यामुळे आरोग्य सेवा कार्यक्रम प्रभावीपणे राबविताना अडचणी निर्माण होत आहेत. सध्या डिग्रस आणि अंढेरा या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचा पदभार सांभाळावा लागत आहे. अंढेरा येथील रिक्त वैद्यकीय अधिकारी व इतर पदे भरल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल.
डॉ. शिवानंद शिंगाडे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र अंढेरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT