देऊळगाव राजा ः लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तरुणीचा विश्वास संपादन करत तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, बुलढाणा तालुक्यातील रहिवासी असलेला आरोपी नितीन शिवाजी बिल्लारी याने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करत “तुझ्याशी लग्न करेन” असे ठाम आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून पीडितेने आरोपीशी भावनिक नाते जोडले. मात्र, या विश्वासाचाच गैरफायदा घेत आरोपीने गेल्या काही महिन्यांपासून पीडितेसोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, पीडितेने लग्नाबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी केली असता आरोपीने अचानक आपला खरा चेहरा दाखवत लग्नास नकार दिला. “मी तुझ्याशी लग्न करणार नाही” असे स्पष्ट सांगत त्याने पीडितेसोबत वाद घालून तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
एवढ्यावरच न थांबता आरोपीने पीडितेला मारहाण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अखेर पीडितेने अंढेरा पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांसमोर आपली संपूर्ण आपबिती कथन केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलिस करीत आहेत.