voter list revision pudhari photo
बुलढाणा

Amravati Teachers Constituency Election | शिक्षक मतदारसंघात पुरुष मतदारांत बुलढाणा, तर महिला मतदारांत अमरावती आघाडीवर

अमरावती विभागात ३५,८१० शिक्षक मतदार; २६ उमेदवार निवडणूक रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

Amravati Division Teachers Seat

बुलढाणा : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत २६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये पाच महिला उमेदवारांचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात एकूण ३५ हजार ८१० पात्र शिक्षक मतदार आहेत. यामध्ये २४ हजार ७३२ पुरुष, तर ११ हजार ७८ महिला मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांच्या संख्येत बुलढाणा जिल्हा आघाडीवर असून, महिला मतदारांची सर्वाधिक संख्या अमरावती जिल्ह्यात आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये मतदारांची विभागणी करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण १० हजार ९८७ मतदार असून, त्यामध्ये ६ हजार २३६ पुरुष आणि ३ हजार ८६१ महिला मतदार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ९ हजार १२४ मतदार असून, त्यात ६ हजार ७३३ पुरुष आणि २ हजार ३९१ महिला मतदारांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात ६ हजार ९३२ मतदार असून, त्यापैकी ४ हजार ९६५ पुरुष आणि १ हजार ९६७ महिला आहेत.

अकोला जिल्ह्यात ५ हजार ९४२ मतदार असून, त्यामध्ये ३ हजार ९०३ पुरुष आणि २ हजार ३९ महिला मतदार आहेत. वाशिम जिल्ह्यात एकूण ३ हजार ७१५ मतदार असून, त्यात २ हजार ८९५ पुरुष आणि ८२० महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंख्येत पुरुषांचे प्रमाण ६९ टक्के, तर महिलांचे प्रमाण ३१ टक्के आहे.

विभागात ८१ मतदान केंद्रे

अमरावती विभागात मतदानासाठी एकूण ८१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी १८ मतदान केंद्रे बुलढाणा जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांच्या ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. बुलढाणा शहरात तीन, तर खामगाव, चिखली आणि मेहकर येथे प्रत्येकी दोन मतदान केंद्रे असतील. उर्वरित नऊ तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी एक मतदान केंद्र राहणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यात तालुकानिहाय मतदारसंख्या

बुलढाणा तालुक्यात १ हजार ७९८, खामगाव ९२७, चिखली १ हजार ८०, मेहकर १ हजार ४०, जळगाव जामोद ४९७, संग्रामपूर १८०, मलकापूर ६२३, नांदुरा ४०२, मोताळा ३५१, शेगाव ६४०, देऊळगाव राजा ४३९, सिंदखेड राजा ५८१ आणि लोणार तालुक्यात ५६६ शिक्षक मतदार आहेत. अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यात एकूण ९ हजार १२४ पात्र शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

२०२० च्या निवडणुकीतील सहा उमेदवार पुन्हा रिंगणात

२०२० मध्ये झालेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २७ उमेदवार होते. त्यापैकी सहा उमेदवार यंदाच्या निवडणुकीतही पुन्हा रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत २६ उमेदवारांमध्ये लढत होणार असून, शिक्षक मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT