विदर्भ

Nagpur BJP: भाजप पाळणार १४ ऑगस्टरोजी ‘विभाजन विभीषिका दिवस’

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस १४ ऑगस्ट रोजी 'विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना) स्मृती दिवस' पाळण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने सोडला आहे.

देशाचे विभाजन झाल्यामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केले. या कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवराय कुळकर्णी म्हणाले की, दीडशे वर्षांच्या ब्रिटीश गुलामगिरीतून मुक्त होऊन प्राप्त झालेल्या स्वातंत्र्याचा यंदाचा अमृत महोत्सव हा प्रत्येक नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाचा सोहळा आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने विकासपथावर वाटचाल करत असताना स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलेल्यांचे स्मरण ठेवलेच पाहिजे. मात्र, स्वातंत्र्य मिळत असतानाच देश खंडित झाल्याची वेदना आपण भारतीयांना कायम राहणार आहे. ही जखम आपल्या हृदयावर आज देखील भळभळते आहे. याच उद्देशाने १४ ऑगस्ट रोजी 'विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना) स्मृती दिवस' पाळण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे.

भारताची फाळणी ही धार्मिक आधारावर झालेल्या विश्वासघाताची कहाणी आहे, अशी भारतीय जनता पार्टीची धारणा असल्याचे शिवराय कुळकर्णी म्हणाले . स्वातंत्र्यापूर्वी २० फेब्रुवारी १९४७ या दिवशी ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट एटली यांनी स्वातंत्र्याचा निर्णय जाहीर केला. ३० जून १९४८ पूर्वी सत्तेचे हस्तांतरण करून देश सोडण्याचे ब्रिटीशांनी जाहीर केले होते. मात्र, त्याआधी ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही, असे शिवराय कुळकर्णी म्हणाले.

फाळणीमुळे आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागली. प्रत्यक्षात स्थलांतराच्या काळात प्रचंड हिंसाचार होऊन जवळपास सव्वा कोटी नागरिकांना सर्वस्व गमावून अक्षरशः रस्त्यावर यावे लागले. सुमारे ६० लाख बिगर मुस्लिमांनी पश्चिम पाकिस्तानातील आपली घरेदारे सोडून भारतात पळ काढला, तर २० लाख बिगर मुस्लिमांनी पूर्व पाकिस्तानातून (आताचा बांगलादेश) घरेदारे सोडून भारतात स्थलांतर केले. या प्रक्रियेत पाच लाखांहून अधिक नागरिकांची हत्या झाली, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हा आकडा दहा लाखांहून अधिक असावा, असेही ते म्हणाले . ब्रिटिशांचे धोरण आणि तत्कालीन नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा यामुळे आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागली याकडे लक्ष वेधले. यावेळी शहर अध्यक्ष बंटी कुकडे उपस्थित होते.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT