ZP schools Pudhari
भंडारा

ZP School Bhandara | जिल्हा परिषद शाळांमध्ये ८७६ शिक्षकांची पदे रिक्त

विद्यार्थी घडणार कसे?, साखळी उपोषणाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

भंडारा: राज्यात जिल्हा परिषद शाळांची स्थिती चिंताजनक असताना त्यात सुधारणा करण्याचे सोडून स्थिती अधिक नाजूक करण्याचे धोरण शासनाने राबविल्याचे चित्र आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांची तब्बल ८७६ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी घडणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षक भरतीची विशेष मोहिम राबवावी, अन्यथा सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी साखळी उपोषण करतील, असा इशारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळा ७६१ व हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय ३२ असे एकूण ७९३ शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये मध्यम व गरीब कुटूंबातील ७० ते ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ नुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. परंतु, हे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे.

राज्यातील इतर भागांप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही शिक्षकांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत.
भंडारा जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची पदे भरण्यात आली. परंतु, ही पदे नाममात्र असल्याने परिस्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. सद्यास्थितीत जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध संवर्गातील ८७६ शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास खुंटला आहे. जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इतर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्पर्धेमध्ये मागे पडत आहेत.

अन्यथा साखळी उपोषण
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. त्यामुळे गावकºयांकडून शाळेला कुलूप ठोकणे, जिल्हा परिषदेवर विद्यार्थ्यांसह मोर्चे काढणे आदी गंभीर प्रकार होत आहेत. त्यामुळे शिक्षकांची पदे तात्काळ भरण्याकरीता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूरी द्यावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण करु, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT