Woman Patient Dies
भंडारा: तापाने शरीरात आलेल्या अशक्तपणामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेली एक महिला रुग्ण रुग्णालयातील बेडवरुन खाली पडली. यात तिचा मृत्यू झाल्याची घटना १० सप्टेंबर रोजी लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात घडली. रेखा केशव मस्के (५५) रा.भागडी ता. लाखांदूर असे या महिलेचे नाव आहे.
रेखा यांची काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती. त्यावर डॉक्टरांनी औषधोपचार केला होता. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३ मधील बेड क्रमांक ३ वर त्यांना दाखल करून घेण्यात आले होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास बेडवर कुस बदलत असताना तोल जाऊन जमिनीवर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना रुग्णालयात उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ उपचार केला. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.