Navegaon Nagzira Tiger Reserve
भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या कोका अभयारण्य परिसरातील पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी अभयारण्यातील आमगाव तलावावर जलपर्यटन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. निसर्गरम्य जलाशय, वनक्षेत्र आणि समृद्ध जैवविविधता लाभलेल्या या परिसरात बोटिंगसह विविध पर्यावरणपूरक पर्यटन सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून, या परिसरात पर्यटनाच्या नव्या पर्वाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील नैसर्गिक जलसंपदा आणि वनसंपत्तीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी कोका अभयारण्यातील कक्ष क्र. १६७ आणि १६८ येथील आमगाव तलावाची निवड करण्यात आली आहे. या परिसरातील निसर्गसौंदर्य, जलाशय आणि वनक्षेत्र पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचा प्रकल्पाचा उद्देश आहे.
प्रस्तावित प्रकल्पात पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता यावा यासाठी आधुनिक तरंगता घाट उभारण्यात येणार आहे. या घाटावर सुरक्षेसाठी रेलिंग आणि नौका बांधून ठेवण्यासाठी विशेष साखळ्यांची व्यवस्था असेल. नौका पाण्यात उतरविण्यासाठी तसेच बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र आरसीसी रॅम्प तयार करण्यात येणार आहे. याशिवाय एकाच वेळी दहा नौका उभ्या राहू शकतील, अशी व्यवस्था प्रस्तावित आहे. नौका सुरक्षितपणे थांबविण्यासाठी अँकरिंग व्यवस्था, तरंगते सुरक्षा बोय आणि जलाशयाच्या कार्यात्मक क्षेत्राची सीमा निश्चित करणारे अडथळे उभारले जाणार आहेत. त्यामुळे जलपर्यटनादरम्यान पर्यटक आणि नौकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे.शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यास कोका अभयारण्य परिसरातील पर्यटनाला नवी ओळख मिळू शकते.
या प्रकल्पात केवळ बोटिंगपुरते पर्यटन मर्यादित न ठेवता पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. तलाव परिसरात विविध सुविधा, मनोरंजनात्मक सोयी आणि पर्यटकांच्या मुक्कामाची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नागपूर, भंडारा आणि परिसरातील पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
जलपर्यटन प्रकल्पामुळे पर्यटनवाढीसोबतच स्थानिक युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने जलसंपत्तीचा उपयोग करून ग्रामीण विकासाला चालना देणे, हा या प्रकल्पामागील मुख्य हेतू आहे.-सूरज गोखले, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोका अभयारण्य